जुनी पेन्शन लागू करणे, अनुदानित शाळांमधील रिक्त पदे भरणे, पदोन्नतीतील त्रुटी दूर करणे यासह शिक्षकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे उत्तर-पश्चिम पदवीधर मतदारसंघ विधान परिषद सदस्य हनुमंत निरानी यांनी सांगितले.
बेळगाव येथे आयोजित बेळगाव जिल्हा हायस्कूल सहशिक्षक संघटनेच्या वार्षिक सभेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पाहुणे म्हणून आलेले बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार राजू शेठ म्हणाले की, बदलत्या चालीरीतीनुसार शाळांच्या मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि शाळांना आधुनिक पद्धतीचा टच देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शिक्षण हे आपले पहिले प्राधान्य आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले जिल्हा शाखेचे अध्यक्ष एस. एम. पाटील म्हणाले की, शिक्षकांच्या गरजा आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी ऊर्जा उपलब्ध करून देण्याबरोबरच सर्व स्तरावरील शिक्षणाची गुणवत्ता आणि व्यवस्था सुधारण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे.
राज्य सरचिटणीस रामू गुगवाड म्हणाले की, पदवीधर व शिक्षक मतदार संघातील लोकप्रतिनिधी शिक्षण व शिक्षकांच्या मागण्यांना प्रतिसाद देत आहेत, त्याचप्रमाणे जुनी पेन्शन प्रणाली लागू करणे आणि रिक्त पदे भरणे अशा अत्यंत आवश्यक असलेल्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न करावेत, असे अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना आवाहन केले.
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग बेळगावचे उपसंचालक मोहनकुमार हंचाटी, बीईओ एसपी दासप्पनवर, मोहन दंडिन, संघटन सचिव तुकाराम बागेन्नवर, उपाध्यक्ष शिवानंद मळगली, एम. एस. तल्लुर, एल. एस. बहादुरी, बी. एस. गानीगेर, बीआरसी एम. एस. मेदर, परशुराम पांडव यांच्यासह जिल्हा व तालुका सहशिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सचिव अशोक खोत यांनी स्वागत केले. सुमित्रा करविनकोप्प व शिवानंद तल्लुर यांनी सूत्रसंचालन केले. वीरेश गणाचारी यांनी आभार मानले.


Recent Comments