जीवनात यशस्वी होण्यात परीक्षा महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अंगी जिद्द बाळगणे महत्वाचे असून जिद्दीने व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा असे आवाहन प्रख्यात करिअर समुपदेशक व सिग्मा फौंडेशनचे संस्थापक व सीईओ अमीन मुदस्सर यांनी केले.
बेळगावात अल इक्रा एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनतर्फे एसएसएलसीच्या विध्यार्थ्यांसाठी सोमवारी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अमीन मुदस्सर पुढे म्हणाले की, वेळेची कदर करून तिचा सदुपयोग केल्याने वेळ तुमची कदर करेल आणि यश मिळवून देईल. वेळ म्हणजे पैसे असे म्हटले जाते. पैसे जसे वाचवणे गरजेचे असते तसाच वेळ वाचवून जितका शक्य असेल तितका अभ्यासात गुंतून परीक्षेत यशस्वी होणे महत्वाचे आहे. विध्यार्थी दशेत अभ्यासात वेळ घालवणे गरजेचे आहे. मौजमजा, सोशल मीडिया काही मिनिटांपुरते मर्यादित ठेवले पाहिजे.
आपण जी रेखा आखू तसे आपले आयुष्य बनते. त्यामुळे योग्य रेखा आखून आयुष्यात यशस्वी झाले पाहिजे. यावेळी त्यांनी विध्यार्थ्यांना परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे कसे जावे?, योग्य करिअर कसे निवडावे, पालकांनी त्यासाठी मुलांना कसे मार्गदर्शन करावे,भारतात आणि परदेशात उच्च पगाराच्या नोकऱ्या, दहावी, बारावीनंतरचे विविध कोर्सेस, उच्च शिक्षणासाठी मिळणाऱ्या स्कॉलरशिप्स आदी विषयांवर विविध उदाहरणे देऊन प्रबोधन केले.

दरम्यान, या उपक्रमाविषयी इन न्यूजला माहिती देताना अल इक्रा एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनचे पदाधिकारी अब्दुल कादिर बाळेकुंद्री म्हणाले की, आपली संस्था गेल्या २३ वर्षांपासून दरवर्षी बेळगावातील सर्व माध्यमांच्या दहावीच्या मुलांसाठी असे मार्गदर्शन शिबीर आयोजित करते. दरवर्षी ८०० ते १ हजार मुले या शिबिरास उपस्थित असतात. याशिवाय संस्था सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. कोरोनासारख्या रोगराईच्यावेळी संस्था रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मदत करते. संस्थेच्या ५ रुग्णवाहिका आणि एक शववाहिका आहे. त्या माध्यमातून समाजसेवा केली जाते असे त्यांनी सांगितले.
या शिबिराला बेळगावातील विविध शाळांचे विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments