Belagavi

म. ए. युवा समितीच्या सामान्यज्ञान परीक्षेला प्रचंड प्रतिसाद

Share

विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी, या परीक्षा देण्याचा सराव व्हावा या उदात्त हेतूने बेळगावात आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे सामान्यज्ञान परीक्षा घेण्यात आल्या. या स्पर्धेला सुमारे १५०० विद्यार्थ्यांचा भव्य प्रतिसाद लाभला.

बेळगावातील मराठा मंदिरच्या सभागृहात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन अशा तीन गटांत आज शुक्रवारी सामान्यज्ञान परीक्षा घेण्यात आल्या. मराठी भाषेतून घेतलेल्या या स्पर्धेत प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तसेच मराठी, गणित व इंग्रजी विषयावर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते. त्यासाठी चार पर्यायी उत्तरे देण्यात आली होती. ओएमआर पद्धतीने उत्तरपत्रिका सोडवायची होती. स्पर्धेला बेळगाव शहर, बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील सुमारे १५०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्पर्धेच्या संयोजनाबाबत इन न्यूजला माहिती देताना म. ए. युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम म्हणाले की, मराठी विद्यार्थ्यांच्या बैद्धिक आणि सामान्यज्ञानात वाढ व्हावी, त्यांना एमपीएससी, केपीएससी आदी स्पर्धात्मक परीक्षांची ओळख व्हावी, या स्पर्धा देण्याचा सराव त्यांना व्हावा या हेतूने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून तिसऱ्यांदा ही स्पर्धा घेण्यात येत आहे. मध्यंतरी कोविडमुळे ही स्पर्धा घेता आली नव्हती. आज तिसरी परीक्षा घेण्यात येत आहे.

म. ए. युवा समितीचे चिटणीस प्रदीप चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, बेळगाव शहर-परिसरातील मराठी माध्यम शाळांच्या विध्यार्थ्यांना विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी, या परीक्षा देण्याचा सराव व्हावा या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. येत्या २-३ महिन्यांत भव्य करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजिण्यात येणार आहे.

दरम्यान, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, खानापूर समितीचे सरचिटणीस निरंजन सरदेसाई, चिटणीस आबासाहेब दळवी, मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव, मराठा सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, म. ए. समिती महिला आघाडीच्या प्रमुख रेणू किल्लेकर आदींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

आज सकाळच्या सत्रात प्राथमिक व माध्यमिक विध्यार्थ्यांसाठी तर दुपारनंतरच्या सत्रात सामान्यज्ञान परीक्षा घेण्यात आली. बेळगाव शहर, तालुका आणि खानापूर तालुक्यातील १५०० विध्यार्थ्यानी ही स्पर्धा परीक्षा दिली. स्पर्धेचे बक्षीस वितरण येत्या २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन समारंभात करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Tags: