Belagavi

भाजप बेळगाव महानगर जिल्हा कार्यकारिणीची बैठक

Share

आगामी लोकसभा निवडणुकीत बेळगाव मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचा संकल्प बेळगाव महानगर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत आज करण्यात आला.

बेळगावात आज सदाशिवनगर येथील पक्ष कार्यालयात पक्षनिरीक्षक अरुण यांच्या उपस्थितीत बेळगाव महानगर जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर भाजप महानगर जिल्हाध्यक्षा गीता सुतार, खासदार मंगल अंगडी, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, राज्य कार्यकारिणी सदस्या उज्ज्वला बडवाण्णाचे, उपमहापौर रेश्मा पाटील आदी उपस्थित होते.

बैठकीला मार्गदर्शन करताना भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके म्हणाले की, भारत विश्वगुरू व्हायचा असेल, देश सर्व दृष्टींनी विकसित करायचा असेल तर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक खासदार निवडून देऊन मोदींचे हात बळकट करण्याची गरज आहे. त्यामुळे मागील निवडणुकीपेक्षाही अधिक मताधिक्क्याने बेळगाव मतदार संघातून भाजपचा खासदार निवडून आणण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. त्यादृष्टीने आपण सर्वांनी बूथ पातळीवरून पक्षाचे संघटन मजबूत करून केंद्राच्या कल्याणकारी योजनांचा जनतेत प्रचार केला पाहिजे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने ग्राम चलो अभियान पुकारले आहे. त्यासाठी ज्याला जी जबाबदारी दिली जाईल ती त्या-त्या कार्यकर्त्यांनी सक्षमपणे पार पाडावी असे आवाहन बेनके यांनी केले.

खासदार मंगल अंगडी म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांनी महिला, युवकांसह समाजातील सर्वच घटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. त्यांचा जनतेत जोरदार प्रचार करून लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी कठोर मेहनत कार्यकर्त्यांनी करावी. मोदींसारखा चांगला पंतप्रधान मिळणं कठीण आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी लोकसभेत भाजपला प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अन्य मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. बैठकीला मनपा सत्तारूढ गटनेते राजशेखर डोनी, नगरसेवक गिरीश धोंगडी, हणमंत कोंगाळी, अभिजित जवळकर, जयतीर्थ सवदत्ती, नितीन जाधव, नगरसेविका वीणा विजापूरे, शिल्पा केकरे, अशोक थोरवत यांच्यासह महानगर भाजप कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: