बेळगाव दक्षिण मतदारसंघात वाजपेयी गृहनिर्माण योजनेतील घरांचे लवकरात लवकर वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी लाभार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन केले.
अटलबिहारी वाजपेयी योजनेंतर्गत घरांसाठी अर्ज केलेल्या बेघर लोकांना अनेक वर्षांनंतरही अद्याप घरे देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे महागाईच्या दिवसात बेघर लाभार्थ्यांचे खूप हाल होत आहेत. त्यामुळे तातडीने घरे देण्यात यावीत, या मागणीसाठी बेळगाव दक्षिण मतदारसंघातील अनगोळ, वडगाव, शहापूर आदी भागातील बेघर लाभार्थ्यांनी आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन केले.
यावेळी इन न्यूज चॅनलशी बोलताना आंदोलकांनी, बेळगाव दक्षिण मतदारसंघात येणाऱ्या अनगोळ, वडगाव, शहापूर आदी भागातील अनेक बेघर लोकांनी अटल आवास योजनेतून घरे मिळावीत यासाठी अर्ज केले आहेत. मात्र त्यांना अजूनही वाजपेयी गृहनिर्माण योजनेंतर्गत निवारा मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

आणखी एका गरीब लाभार्थ्याने सांगितलं की, घरासाठी अर्ज करून 12 वर्षे उलटून गेली, पण घरे मिळालेली नाहीत. आमच्याकडे आजपर्यंत जागा नाही. आम्ही 20-30 वर्षांपासून दक्षिण मतदारसंघात मजूर म्हणून काम करत भाड्याच्या घरातून रहात आहोत. महानगरपालिकेकडे चौकशी केली असता पालिकेचे अधिकारी आमच्यासाठी घरे बांधून देणार असल्याचे सांगत राहिलेत. परंतु अद्याप काहीच कृती केलेली नाही अशी नाराजी व्यक्त केली.
शंकरप्पा मागुंदावर, शारदा बसवंतप्पा तोरगल, श्वेता, इरन्ना कुंबार, कस्तुरी शंकर इटगी यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी आंदोलनात सहभागी झाले होते.


Recent Comments