Belagavi

वड्डरवाडी दुर्गादेवी यात्रेनिमित्त महाप्रसादाचे वाटप

Share

बेळगावातील रामनगर वड्डरवाडी येथील श्री दुर्गादेवी मंदिराच्या पंचवार्षिक यात्रेनिमित्त आज विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

बेळगावातील रामनगर वड्डरवाडी येथील श्री दुर्गादेवी मंदिराच्या दर पाच वर्षै होणाऱ्या पाच दिवसीय यात्रेला मंगळवारी श्रद्धा-भक्तीने प्रारंभ झाला. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी मंदिरात देवीची ओटी भरण्यासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. केवळ बेळगावच नव्हे तर नोकरी व्यवसायानिमित्त परगावी, परराज्यात राहणाऱ्या वड्डर समाजबांधवांनी आज यात्रेला आवर्जून हजेरी लावली. महिलांनी देवीची भक्तिभावाने ओटी भरून वडीलधाऱ्यांना आहेर केला.

यासंदर्भात इन न्यूजला माहिती देताना श्री दुर्गादेवी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी हनुमंत कागलकर यांनी सांगितले की, दुर्गादेवी यात्रेनिमित्त काल मंगळवारपासून ७ फेब्रुवारीपर्यंत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आज देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम महिलांनी केला. त्याशिवाय मंदिर समितीतर्फे भाविकांना महाप्रसाद वाटपाचे आयोजन केले आहे. असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

मंदिर समितीचे अन्य एक पदाधिकारी व पंच बाबू कागलकर यांनी सांगितले की, वाडवडिलांच्या काळापासून येथे श्री दुर्गादेवीची यात्रा दर ५ वर्षातून एकदा भरविण्यात येते. त्यासाठी आम्ही आमच्या सर्व दूरवरच्या नातेवाईकांना निमंत्रण देतो. त्यानुसार आज महाराष्ट्रातील कोल्हापूर, गारगोटी, भुदरगड, खेड, रत्नागिरी, सांगली, मिरज यासह विविध भागातून वड्डर समाजबांधवांनी यात्रेला हजेरी लावली आहे. सर्वाना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. देवीच्या कृपेने सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्याचे त्यांनी सांगितले.

यात्रेनिमित्त वड्डरवाडी दुर्गादेवी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. बेळगाव शहरासह विविध ठिकाणच्या भाविकांनी मनोभावे दुर्गादेवीचे दर्शन घेतले.  वड्डरवाडी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या गल्लीचे पंचमंडळी, दुर्गादेवी युवक मंडळ, क्रांतिवीर वड्रा मल्लाप्पा सेने, आंबेडकर क्रांती युवा वेदिके, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि रहिवाशांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Tags: