इमारत बांधकाम व इतर कामगार तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना ३१ हजार रुपये किमान वेतन द्यावे या व अन्य मागण्यांसाठी सेंटर फॉर इंडियन ट्रेंड युनियनच्या नेतृत्वाखाली देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून बेळगावात आज खा. मंगल अंगडी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
शहरातील चन्नम्मा चौकातून येथून निषेध रॅली काढून बांधकाम कामगारांनी खासदार मंगल अंगडी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी बोलताना सिटूचे पदाधिकारी जी. एम. जैनेखान म्हणाले की, कर्नाटक राज्यात कार्यरत लाखो बांधकाम क्षेत्रातील कामगार सार्वजनिक व बांधकाम कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी करत असून राज्यभर स्वाक्षरी संकलन आंदोलन करून हे निवेदन सादर करत आहोत. श्रीमंतांवर कर वाढवा आणि गरीबांना जगू देणारी धोरणे राबवा, शेतकरी विरोधी कायदे मागे घ्या, शेतमालाला योग्य आधारभूत भाव मिळावा, एपीएमसी यंत्रणा मजबूत करावी, शेतीमालाचे अनुदान कमी करण्याची धोरणे सोडून द्यावीत, देशाची एकात्मता बिघडवणाऱ्या आणि सद्भावना नष्ट करणाऱ्या कृती आणि शक्तींना आळा घातला पाहिजे. संविधानातील धर्मनिरपेक्ष मूल्ये जपली पाहिजेत. रेल्वे आणि वीज यासह सर्व सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण करण्याचे सर्व प्रकार सोडून दिले पाहिजेत. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि सेवा बळकट केल्या पाहिजेत. शिक्षण महाग आणि अवैज्ञानिक बनवणारे नवीन शैक्षणिक धोरण राबवू नये अशा आमच्या मागण्या आहेत, असे ते म्हणाले.
केंद्र सरकारने इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण कायदा-1996 आणि इमारत आणि इतर बांधकाम कामगार उपकर कायद्यात दुरुस्ती करू नये, कामगार कल्याण मंडळाकडे उपलब्ध असलेला निधी केवळ कामगारांना सुविधा देण्यासाठी वापरावा. मंडळाने थकबाकी उपकर सक्तीने वसूल करून घरे बांधण्यासाठी अनुदान द्यावे, कल्याण मंडळाच्या उपकर निधीचा गैरवापर करून केलेली सर्व खरेदी बंद करण्यात यावी.
मंडळाने खरेदी केलेल्या टूल किट्स व्यवहारातील गैरकारभाराची चौकशी करावी, लॅपटॉप आणि वैद्यकीय तपासणीसाठी केंद्र आणि राज्य सरकार आणि मोठ्या खाजगी बांधकामांकडून अनिवार्य उपकर वसूल केला पाहिजे. कामगार कल्याण मंडळांनी लोकशाही पद्धतीने काम केले पाहिजे आणि राजकीय हस्तक्षेप थांबला पाहिजे. सर्व कल्याणकारी मंडळांमध्ये केंद्रीय कामगार संघटनांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित केले पाहिजे, असे ते म्हणाले.
आंदोलनात कोषाध्यक्ष मारुती मुदगुरी, सचिव नागप्पा संगोळी, मंदा नेवगी, चंद्रकांत हलगळे, दिलीप वारके, महादेव कोप्पद आदींनी सहभाग घेतला.


Recent Comments