सामाजिक जीवनात महिलांना, मतदानात सर्वांना समान अधिकारी देणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. मतदानाच्या अधिकाराचा वापर करून समृद्ध राष्ट्र निर्माण योगदान द्या, असे आवाहन विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी केले.
बेळगावातील केएलई संस्थेच्या लिंगराज व आरएलएस विज्ञान महाविद्यालयात आज राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ते नवमतदारांना उद्देशून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लिंगराज कॉलेजचे प्राचार्य एच. एस. मेलिनमनी, आर.एल.एस. कॉलेजच्या प्राचार्या ज्योती कवळेकर, भाजप प्रवक्ता ऍड. एम. बी. जिरली, भाजप नेत्या उज्ज्वला बडवाण्णाचे उपस्थित होते.
महांतेश कवटगीमठ पुढे म्हणाले, जगात अनेक देशांत महिलांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले होते. अमेरिकेसारख्या प्रगत देशात महिलांना हा अधिकार नव्हता. सर्वांत जुनी लोकशाही म्हणवल्या जाणाऱ्या ब्रिटनमध्ये महिलांना स्वातंत्र्य होते, पण मतदानाचा हक्क नव्हता. स्वित्झर्लंडमध्ये 1971 पर्यंत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. पण भारतात अगदी बाराव्या शतकातदेखील बसवण्णा यांनी महिलांना समान अधिकार दिले होते. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशकाळात केवळ सुशिक्षित आणि पांढरपेशांनाच मतदानाचे अधिकार होते.

पण तेंव्हा मतदानाचे प्रमाण नगण्य होते. 1918 मध्ये 6%, 1935 मध्ये 10% इतके कमी मतदानाचे प्रमाण असायचे. 1974 मध्ये स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने महिलांसह सर्वांना मतदानाचा अधिकार दिला. हा अधिकारी लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना मिळालेला सर्वांत महत्वाचा मूलभूत अधिकार आहे. याचा वापर करून निस्पृह, देशप्रेमी लोकप्रतिनिधी निवडून देण्याची संधी मिळते. त्यामुळे मतदानाचा कंटाळा न करता, हा अधिकार वापरून कर्तव्यनिष्ठ लोकप्रतिनिधी निवडून द्या असे आवाहन त्यांनी नवमतदारांना केले.
यावेळी अन्य मान्यवरांनीही विचार मांडले. कार्यक्रमास दोन्ही कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विध्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments