Belagavi

आ. अभय पाटील आयोजित पतंग महोत्सवात नेत्रदीपक क्रॅकर शो

Share

बेळगावातील बीएस येडियुरप्पा मार्गावरील मालिनी सिटी येथे आमदार अभय पाटील आयोजित आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात सोमवारी रात्री आकर्षक, नेत्रदीपक क्रॅकर शोने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

विविध डिझाईन्सच्या क्रॅकर्सचा नेत्रदीपक शो पाहून राज्यासह राज्याबाहेरून मोठ्या संख्येने आलेले लोक खूश झाले. त्यांनी त्यांच्या मोबाईल आणि कॅमेर्‍यात क्रॅकर शोचे आश्चर्यकारक क्षण टिपून आनंद साजरा केला.

गेल्या अनेक वर्षांपासून आमदार अभय पाटील हे बेळगाव शहरात विकासाबरोबरच मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित करत आहेत, होळी मिलन, रांगोळी-चित्रकला स्पर्धा, मातीतले देशी खेळ अशा कार्यक्रमांबरोबरच आता त्यांनी आंतरराष्ट्रीय पतंग फेस्टिव्हल आयोजित केला आहे. त्यात डीजे नाईट्स, डान्स स्पर्धा, युवकांसाठी उमंग महोत्सव आणि क्रॅकर्स शो झाला. यात अनेक गुणवंत युवक-युवतींनी कलागुण सादर केले. सोमवारी रात्री झालेल्या क्रॅकर शोमध्ये विविध आकर्षक फटाक्यांची रोषणाई, आतषबाजी करून राममंदिराच्या उद्घाटनाचा प्रसंग सादर करण्यात आला. आदित्य मिल्कचे संचालक विजयकांत सिदनाळ यांच्या हस्ते क्रॅकर शोचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही बेळगाव येथे विकास आणि रोजगाराच्या पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन येथे केले आहे. क्रॅकर शो सादर करण्यासाठी महाराष्ट्रातून कुशल लोक आले आहेत. याशिवाय फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे ते म्हणाले.

यावेळी डॉ. सुदर्शन सगरे, रविराज पाटील, संतोष पाटील, चैतन्य कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

Tags: