Belagavi

बेळगावात फोर्ट रोडवर किरकोळ दगडफेक

Share

अयोध्येतील श्री राममंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेचा उत्सव सारे शहर साजरा करत असतानाच सोमवारी रात्री उशिरा बेळगावातील फोर्ट रोड-पाटील गल्ली परिसरात दगडफेक झाल्याची घटना घडली.

अयोध्येतील राममंदिराच्या लोकार्पणानंतर बेळगावात घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांच्या गटावर दुसऱ्या गटाकडून दगडफेक करण्यात आली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. बेळगावच्या फोर्ट रोड-पाटील गल्ली कोपऱ्यावर ही घटना घडली. राममंदिराच्या उद्घाटनानंतर तरुणांचा एक गट जय श्री रामचा जयघोष करत बाहेर पडला. यावेळी तरुणांच्या एका गटावर दुसऱ्या गटाकडून दगडफेक करण्यात आली. त्यांनीही प्रत्युत्तरात दगडफेक केली. एकमेकांवर दगडफेक झाल्याने दोन्ही गटात तणाव निर्माण झाला होता. तत्काळ घटनास्थळी मार्केट पोलीस निरीक्षक महांतेश द्यामन्नावर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दाखल झाले.

पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याने दोन्ही गटातील तरुण घटनास्थळावरून तत्काळ पळून गेले. मार्केट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसी कॅमेरे तपासले. खबरदारीचा उपाय म्हणून केएसआरपीची दोन पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली होती. दरम्यान घटनास्थळी डीसीपी स्नेहा पी. व्ही., मार्केट एसीपी सदाशिव कट्टीमनी आदींनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Tags: