Belagavi

बेळगावात साकारले प्रजासत्ताक दिनाचे शानदार संचलन

Share

बँडच्या लयबद्ध तालावर पावले टाकत शिस्तबद्धरीत्या संचलन करणारे विध्यार्थी-विद्यार्थिनी, त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात मिळणारी दाद अशा भारावलेल्या वातावरणात बेळगावात आज जणू दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाचे संचलनच अवतरले. निमित्त होते रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल आयोजित इंटर स्कूल मार्च पास्ट अँड बँड सेट स्पर्धेचे !

विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत व्हावी, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलतर्फे गेली ६ वर्षे बेळगावात इंटर स्कूल मार्च पास्ट अँड बँड सेट स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा सातव्या वर्षीही आज रविवारी सकाळी गोवावेस येथील रोटरी-कार्पोरेशन स्पोर्ट्स अकादमी येथे या स्पर्धेचे आयोजन केले होते. टिळकवाडीतील आरपीडी क्रॉस येथे वाहतूक विभागाचे एसीपी गंगाधर यांनी विध्यार्थ्यांच्या पथसंचलनाला निशाणी दाखवून चालना दिली. त्यानंतर बँडच्या तालावर लयबद्धरीत्या आकर्षक पंथ संचलन करून विध्यार्थ्यानी डोळ्यांचे पारणे फेडले. त्यानंतर गोवावेस येथील रोटरी-कार्पोरेशन स्पोर्ट्स अकादमी येथे बँड सेट स्पर्धा झाली. विविध शाळांच्या सुमारे ५०० विध्यार्थी-विद्यार्थिनींनी गणवेशात, हाती ध्वज घेऊन पथसंचलन केले.

यावेळी बोलताना रोटरी क्लबचे पदाधिकारी अजय हेडा म्हणाले की, यंदा आम्ही सातव्या वर्षी या स्पर्धा ठेवल्या आहेत. विद्यार्थ्यांना लहान वयातच देशभक्तीचे संस्कार व्हावेत या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी शाळा आणि प्रायोजकांचे आभार मानले.

रोटरी क्लबचे इव्हेन्ट चेअरमन किरण इनामदार यांनी सर्वांचे स्वागत करून या स्पर्धेत २० शाळांमधील सुमारे ५०० विध्यार्थ्यानी सहभाग घेतल्याचे सांगितले. शालेय मुलांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम वाढीस लागावे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलचे अध्यक्ष मंजुनाथ अळवणी, सचिव अभय जोशी यांच्यासह क्लबचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: