अयोध्येत येत्या २२ जानेवारीला श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या बाल रूपातील मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावातील मोतीलाल चौक, भेंडीबाजार येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात येत्या सोमवारी विशेष पूजा, महाआरती व तब्बल २० हजार भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
अयोध्येतील श्रीरामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त देशभरात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बेळगावातील मोतीलाल चौक, भेंडीबाजार येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात विविध १० गल्ल्या आणि व्यापारी बांधवांच्या वतीने येत्या सोमवारी विशेष पूजा, महाआरती व तब्बल २० हजार भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला असून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. आज शनिवारी त्याची पाहणी करून आयोजकांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
या संदर्भात इन न्यूजशी बोलताना सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रोहित रावळ यांनी सांगितले की, श्रीराम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त येत्या सोमवारी सकाळी विशेष पूजा आणि महाआरतीचे आयोजन केले आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता मंदिर ट्रस्ट, परिसरातील व्यापारी बांधव आणि मोतीलाल चौक-भेंडीबाजार, पांगुळ गल्ली, माळी गल्ली, टेंगिनकेरी गल्ली, कसाई गल्ली, भोई गल्ली, मेणसी गल्ली, आझाद गल्ली, कामत गल्ली, भातकांडे गल्ली अशा १० गल्लींमधील पंच, नागरिकांच्या सहकार्याने २० हजार भाविकांना पुरेल इतक्या महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सर्वानी या सोहळ्यात भाग घेऊन यशस्वी करावा असे आवाहन त्यांनी केले.
मंदिर समितीचे पदाधिकारी व व्यापारी महेश पोरवाल यांनी सांगितले की, श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेचा आम्हा सर्वांना अत्यंत आनंद होत आहे. त्यानिमित्त आम्ही सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट आणि दहा गल्लीतील नागरिकांच्या सहकार्याने विशेष पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सर्व बेळगाववासीयांनी यात सहभागी होऊन महाप्रसादाचा माभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले की, तब्बल ५०० वर्षांनंतर प्रभू श्रीराम आपल्या जन्मभूमीत विराजमान होत आहेत, ही सर्व हिंदूंसाठी अभिमानाची बाब आहे. ज्या रॅम मंदिरासाठी अनेक लढाया लढल्या गेल्या, अनेक हिंदूंनी प्राणांचे बलिदान दिले, त्यांचे बलिदान सार्थ ठरवणारा हा एक सुवर्णदिन ठरणार आहे. त्यानिमित्त आम्ही बेळगावातील दहा गल्ल्या आणि व्यापारी बंधूंच्या सहकार्याने सिद्धिविनायक मंदिरात विशेष पूजा, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे. दरवर्षी आपण दिवाळी साजरी करतो, मात्र यानिमित्त सार्वजनिकरित्या दिवाळी साजरी करून सर्वांचे तोंड गोड करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवला आहे, त्यात सर्वांनी सहभागी होऊन तो यशस्वी करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रोहीत रावल, हणमंतसिंग ठाकूर, महेश पोरवाल, मदन तिवारी, जगताराम प्रजापत, हरिसिंग ठाकूर, प्रभू प्रजापत, मिलिंद बसरीकट्टी, विजय जाधव, सुनिल मुतगेकर, राजु पालीवाला आदी उपस्थित होते.


Recent Comments