अयोध्येत येत्या २२ जानेवारीला श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानिमित्त बेळगावात विश्व हिंदू परिषद आणि हनुमान चालीसा पठण परिवारातर्फे उद्या, शनिवारी सायंकाळी सरदार्स हायस्कूल मैदान आणि टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर अखंड, अहोरात्र हनुमान चालीसा पठण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दहा हजारहून अधिक राम-हनुमान भक्त एकाचदिवशी एकाचवेळी हनुमान चालिसाचे पठण करणार आहेत.
बेळगावात आज आयोजित पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषद प्रांत कोषाध्यक्ष कृष्णा भट यांनी ही माहिती देऊन सांगितले की, देश-जगभरातील करोडो हिंदूंचे स्वप्न असणारे श्रीराम मंदिर अयोध्येत साकारत आहे. २२ जानेवारीला तेथे प्रभू रामचंद्रांच्या बाल रूपातील मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या शुभप्रसंगी बेळगावात विश्व हिंदू परिषदेने बेळगावात अखंड-अहोरात्र हनुमान चालीसा पठणाचा संकल्प सोडला आहे.
टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदान आणि शहरातील सरदार्स हायस्कूल मैदानावर उद्या शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता एकाचवेळी या उपक्रमाला प्रारंभ करण्यात येणार आहे. दोन्ही ठिकाणी मिळून दहा हजारांहून अधिक हिंदू या उपक्रमात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. शास्त्रीनगरातील विश्व हिंदू परिषदेच्या ‘समरसता भवन’ या कार्यालयात देखील १६ जानेवारीपासून हा उपक्रम सुरु केला असून, आतापर्यंत हनुमान चालीसा पथनाची ५१ हजार आवर्तने पूर्ण झाली आहेत, असे त्यांनी सांगितले.
बेळगाव आणि अयोध्येचा अन्योन्य संबंधी कसा आहे हे स्पष्ट करताना कृष्णा भट म्हणाले की, विश्व हिंदू परिषदेचे माजी जागतिक अध्यक्ष दिवंगत अशोक सिंघलजी यांनी अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे हा ध्यास घेऊन आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या या कार्यात बेळगावचे ज्येष्ठ प्रचारक सदानंदजी काकडे आणि बाबुराव देसाई यांनी साथ दिली. त्याशिवाय बेळगावातील शास्त्रीनगरातील विश्व हिंदू परिषदेच्या ‘समरसता भवन’ या कार्यालयाचे उदघाटन अशोक सिंघलजी यांच्याहस्ते झालेले आहे. विहिंप कार्यालयाशेजारील केशव भवन या संघाच्या शाखा कार्यालयातील प्रमुख गोपालजी हेदेखील मूळचे बेळगावचे असून, त्यांनी बीएससीपर्यंतचे शिक्षण बेळगावच्या लिंगराज कॉलेजमध्ये पूर्ण केले आहे. त्यामुळे बेळगावकरांनी हनुमान चालीसा पठण उपक्रमात सहभाग घेऊन तो यशस्वी करावा असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील १०९ प्रमुख मंदिरे आणि साडेचार लाख घरांमध्ये आम्ही विहिंपच्या वतीने अयोध्या मंत्राक्षता आणि राममंदिर मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमंत्रणपत्रिका पोहोचवल्या आहेत असे ते म्हणाले.
बजरंग दलाचे बेळगाव विभाग संयोजक भावकाण्णा लोहार म्हणाले की, २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या हनुमान चालीसा पठण कार्यक्रम यशस्वी करणे ही सर्व हिंदूंची जबाबदारी आणि कर्तव्यही आहे. यासाठी बजरंग दल देखील परिश्रम घेत आहे. व्हॅक्सिन डेपो आणि सरदार हायस्कूल मैदानावर होणाऱ्या या उपक्रमात बेळगाववासीयांनी प्रचंड संख्येने सहभागी होऊन तो यशस्वी करावा असे आवाहन त्यांनी केले.
पत्रकार परिषदेला जेठाभाई पटेल, मुनिलाल भंडारी यांच्यासह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हनुमान चालीसा पठण परिवार आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments