Belagavi

बेळगावात मादिग आरक्षण संघर्ष समितीचे आंदोलन

Share

रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांचा एकेरी उल्लेख करून अपमान करणारे गोकाक उपविभागाचे डीएफओ शिवानंद नायकवाडी यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी मादिग आरक्षण जिल्हा संघर्ष समितीतर्फे आज बेळगावात निदर्शने करण्यात आली.

मादिग आरक्षण संघर्ष समिती जिल्हा शाखेतर्फे आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने करून आ. दुर्योधन ऐहोळे यांचा अपमान करणाऱ्या वनाधिकारी शिवानंद नायकवाडी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. फ्लो
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मादिग आरक्षण संघर्ष समिती जिल्हा शाखेचे अध्यक्ष बसवराज अरवळ्ळी यांनी सांगितले की, दुर्योधन ऐहोळे हे एक सज्जन, सरळ स्वभावाचे राजकारणी आहेत.

आपल्या मतदार संघातील एका कामासंदर्भात काही दिवसांपूर्वी त्यांनी गोकाकचें डीएफओ शिवानंद नायकवाडी यांच्याशी संपर्क साधला असता, नायकवाडी यांनी त्यांना, तुझ्यासारखे खूप आमदार पाहिले आहेत जा, असा एकेरी उल्लेख करून अपमान केला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा अवमान झाला आहे. त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे केली आहे. राज्यात मादिग आरक्षण संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात येत आहेत. पण अजूनही सरकारने डीएफओ नायकवाडी यांच्यावर कारवाई केलेली नाही हे निषेधार्ह आहे. त्यांच्यावर त्वरित कारवाई न केल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

निदर्शने केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी मादिग आरक्षण संघर्ष समितीचे राज्य उपाध्यक्ष मुरुगेश केंचन्नावर, सरचिटणीस परशराम वंटमुरी, पदाधिकारी मारुती रंगापुरे, यल्लाप्पा हुदली, बाबू पुजारी, निंगाप्पा तळवार, सुभाषचंद्र हुलेप्पन्नावर, पेडम्मा अनंतपूर, शंकर दोडमनी आदी उपस्थित होते.

Tags: