कोकण मराठा समाज, बेळगाव या संघटनेच्या वतीने किल्ला परिसरातील आराधना विशेष मुलांच्या शाळेला विविध साहित्याची देणगी देण्यात आली.
बेळगावात विशेष मुलांच्या सक्षमीकरणासाठी किल्ला परिसरातील आराधना विशेष मुलांची शाळा गेल्या अनेक वर्षांपासून अथक परिश्रम घेत आहे. सरकारच्या अल्प अनुदानातून हि शाळा चालविण्यात येत आहे. याची दखल घेऊन विशेष मुलांच्या सक्षमीकरणात अडथळे येऊ नयेत या सद्हेतूने कोकण मराठा समाज, बेळगाव या संघटनेकडून दरवर्षी शाळेला काही ना काही मदत देण्यात येते. त्यानुसार यंदाही या शाळेला सेफ्टी दरवाजा, रॅक आणि विशेष मुलांना खेळणे व स्पर्धांतील सरावासाठी दोन सायकली मदत म्हणून देण्यात आल्या. कोकण मराठा समाजाचे अध्यक्ष डॉ. सोयर एस. राणे यांच्याहस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना कोकण मराठा समाजाचे उपाध्यक्ष डॉ. राजेश एस. पोवार म्हणाले की, विशेष मुलांचे सक्षमीकरण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रशंसनीय कार्य आराधना शाळा करत आहे. अशा संस्थेला मदत करण्यात आम्हाला आनंद होत आहे. भविष्यातही या शाळेला आम्ही आनंदाने मदत करू असे त्यांनी सांगितले.

आराधना शाळेचे मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी सांगितले की, कोकण मराठा समाजाकडून आमच्या शाळेला नेहमीच मदत केली जाते. गेल्यावर्षीही त्यांनी मदत केली होती. यंदा मुलांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी दरवाजा, दोन रॅक आणि पॅरालिम्पिक गेम्समध्ये सायकलिंगमध्ये भाग घेणाऱ्या विशेष मुलांना सरावासाठी दोन सायकली त्यांनी दिल्या आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत असे सांगितले
यावेळी कोकण मराठा समाजाचे सचिव राजन नाईक, कोषाध्यक्ष उत्तम साळुंखे, सदस्य डॉ. प्रकाश गावकर, सुदर्शन सावंत, डॉ. प्रवीणकुमार नाईक, सुशांत सावंत, पूजा नाईक, ज्योत्स्ना राणे तसेच आराधना विशेष मुलांच्या शाळेचे शिक्षक, कर्मचारी, पालक आदी उपस्थित होते.


Recent Comments