मुस्लिम समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात मुस्लिम समाजाचे आमदार आवाज उठवत नसल्याच्या निषेधार्थ बेळगावात आज एसडीपीआयच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
राज्यात मुस्लिम समाजावर अन्याय होत आहे, मुस्लिम महिलांबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. सरकार मुस्लिम समाजासाठी घोषित केलेला निधी देत नाही आणि याविरोधात एकही मुस्लिम आमदार आवाज उठवत नसल्याचा आरोप करत सोशालिस्ट डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज, सोमवारी बेळगावातील चन्नम्मा चौकात निदर्शने करण्यात आली.
एमएलए राजू सेठ चुप्पी तोडो, एसडीपीआय झिंदाबाद अशा घोषणा देत हातात फलक घेतलेल्या एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांनी चन्नम्मा चौकात निदर्शने केली. यावेळी इन न्यूजशी बोलताना एसडीपीआयचे पदाधिकारी अब्दुल मजीद म्हणाले की, कर्नाटक विधानसभेत, सरकारमध्ये मुस्लिम समाजाचे ९ आमदार आहेत. कर्नाटकात मुस्लिम समाजावर अन्याय होत आहे. पण यातील एकही आमदार आवाज उठवत नाहीय. त्यात आसिफ उर्फ राजू सेठ यांचाही समावेश आहे.
मुस्लिम समाजाला २-बी आरक्षण पुन्हा लागू करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी मुस्लिम समाजासाठी १० हजार कोटींची घोषणा केली होती. त्यापैकी केवळ २ हजार कोटी देऊ केले आहेत, हिजाब-हलाल, रा. स्व. संघाचे नेते प्रभाकर यांनी मुस्लिम महिलांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. ते सगळ्याच मुस्लिम महिलांना लागू पडते, अशा अनेक विषयांवर मुस्लिम लोकप्रतिनिधींनी आवाज उठवणे गरजेचे असूनही एकही मुस्लिम आमदार त्याविरोधात बोलत नाही. याच्या निषेधार्थ आम्ही एसडीपीआयच्या वतीने आज आंदोलन छेडले आहे, असे मजीद यांनी सांगितले.
या आंदोलनात एसडीपीआयचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Recent Comments