Belagavi

मनपा महसूल यल्लेश निरीक्षक बच्चलपुरींवर कारवाईसाठी निदर्शने

Share

बेळगाव महापालिकेच्या महसूल शाखेत निरीक्षकपदी कार्यरत असलेल्या यल्लेश बच्चलापुरी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी वड्डर भोवी (एससी) युवक संघटनेच्या वतीने आज महापालिकेच्या आवारात जोरदार आंदोलन करण्यात आले.

वड्डर भोवी (एससी) युवक संघाचे अध्यक्ष परमेश क्यारकट्टी यांच्या नेतृत्वाखाली असंख्य लोकांनी आंदोलनात सहभाग घेऊन यल्लेश बच्चलपुरी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर महानगर पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना निवेदन देऊन यल्लेश बच्चलपुरी यांच्या बदलीची मागणी केली.

वडदार एसएसी युवक संघाचे परमेश क्यारकट्टी यांनी सांगितले की, यल्लेश बच्चलपुरी 2020 मध्ये प्रथम श्रेणी सहाय्यक म्हणून मनपा सेवेत रुजू झाले. त्यानंतर त्यांनी राजकीय दबाव आणून महसूल निरीक्षक पद मिळवले. याच पद्धतीने राजकीय, संघटनात्मक दबाव वरिष्ठांवर आणून त्यांच्यासाठी फायदेशीर असलेल्या 8 प्रभागात त्यांनी सलग 3 वर्षे काम केले. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी, नगरसेवकाने प्रश्न विचारला असता, निष्पाप दलित लोकांच्या सहभागाने दलित संघटनेकडून दबाव आणला आहे. दलित लोकांच्यातच फूट पाडण्याचे काम यल्लेश बच्चलपुरी यांनी केले आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

पीआयडी खाते बदल करून उतारे देण्यासाठी लोकांना 1 ते 2 महिने वाट पहायला लावणे, त्यासाठी लोकांना त्रास देणे, महिला वसतिगृहात जाऊन असभ्य वर्तन करणे, येडियुरप्पा मार्गावरील 2 ते 3 एकर जमीन भोवी आणि विणकर लोकांना दिली. पण त्याची कोणतीही कागदपत्रे न देता त्यापैकी 20 गुंठे जागा आपल्या नावावर करून घेतली. याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्थानिक लोक जाब विचारण्यासाठी गेले तर गुंडांना बोलावून ते लोकांना घाबरवतात. त्यांच्याबद्दल महानगरपालिकेकडे जनतेने अनेक तक्रारी केल्या आहेत. त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यांच्यावर अनेक प्रकरणे प्रलंबित असून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आगामी काळात तीव्र संघर्ष करू, असा इशारा त्यांनी दिला.

वड्डर भोवी (एससी) युवक संघाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात वड्डर भोवी युवक संघाचे पदाधिकारी व समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: