बेळगाव तालुक्यातील बसुर्ते गावातील सुगंधा मोरे या अंगणवाडी मदतनीस महिलेवर झालेल्या हल्ल्याचा कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध केला.
बेळगाव तालुक्यातील बसुर्ते गावातील अंगणवाडी मदतनीस सुगंधा मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्ह्यात महिलांना संरक्षण मिळत नसल्याचा संताप निदर्शकांनी व्यक्त केला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे नेते जी. एम. जैनेखान यांनी सांगितले की, बेळगाव तालुक्यातील बसुर्ते गावात सुगंधा मोरे या ५० वर्षीय अंगणवाडी मदतनीस महिलेवर क्षुल्लक कारणावरून विळ्याने हल्ला करण्यात आला. यात तिचे नाक व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. अंगणवाडीतील मुलांनी शेजारच्या घराच्या आवारात उगवलेली फुले तोडल्याने अंगणवाडी मदतनीस महिलेला शिवीगाळ करून विळ्याने प्राणघातक हल्ला केला. घरमालक कल्याणी मोरे हिला हा हल्ला केल्याबद्दल तातडीने अटक करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारने संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
निदर्शने केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Recent Comments