Belagavi

बेळगावात डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघातर्फे निदर्शने

Share

बेळगाव तालुक्यातील सुळगा गावातील इंदिरा गांधी निवासी शाळेत अनागोंदी कारभार सुरु आहे, जेवणाची योग्य व्यवस्था नसल्याचा आरोप करत डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघाच्या कार्यकर्त्यांनी आज बेळगावात आंदोलन केले.

डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघातर्फे बेळगाव मागासवर्गीय कल्याण विभागाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. सुळगा गावातील भाड्याच्या इमारतीत असलेल्या इंदिरा गांधी निवासी शाळेमध्ये मुलांसाठी योग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत, जेवणाचा दर्जा चांगला नसल्यामुळे मुले आजारी पडत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे वसतिगृह वॉर्डन आणि मुख्याध्यापकांना निलंबित करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना आंदोलकांनी सांगितले की, सुळगा गावात भाड्याच्या इमारतीत इंदिरा गांधी निवासी शाळा आहे. शाळेत सहावी ते दहावीपर्यंतचे 250 विद्यार्थी आहेत. येथे मुलांसाठी जेवणाची योग्य व्यवस्था नाही. त्यांना केवळ डाळ-भात जेवणात दिले जाते. चपाती, अंडी किंवा केली दिली जात नाहीत. याबाबत विचारणा केल्यावर, सरकारकडून अनुदान आले नसल्याचे सांगितले जाते. येथील वसतिगृहाचे वॉर्डन आणि मुख्याध्यापक दोघेही सरकारी पैशांचा दुरुपयोग करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. बाइट
यावेळी डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघाचे अध्यक्ष लक्ष्मण कोलकार म्हणाले की, निवासी शाळेतील मुलांकडून शौचालय साफ करून घेण्यात येत आहे, वसतिगृह स्वच्छ नाही, मुले आजारी पडत आहेत, वॉर्डन मुलांची काळजी घेत नाही आणि निवासी शाळेला स्वतःची इमारत आणि आवश्यक सुविधा पुरविण्यात अधिकारीही अपयशी ठरले आहेत, असा आरोप त्यांनी केला.


यावेळी डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Tags: