Belagavi

यत्नाळ यांच्यासाठी जय मृत्युंजय स्वामीजींची जोरदार बॅटिंग

Share

विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी पक्षविरोधी कारवाया केलेल्या नाहीत, भाजप नेत्यांनी त्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, असे सांगत कुडल संगम पंचमसाली पीठाचे जय मृत्युंजय स्वामीजी यांनी यत्नाळ यांच्या बाजूने जोरदार बॅटिंग केली.

बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना कुडल संगम पंचमसाली पीठाचे जय मृत्युंजय स्वामीजी म्हणाले की, लिंगायत पंचमसाली नेत्यांची सर्वच पक्षात बदनामी होत आहे. पंचमसाली समाज याचा निषेध करतो. कोणत्याही पक्षाच्या ज्या नेत्याने आमच्या आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा दिला असेल त्या सगळ्यांच्या पाठीशी सर्व पंचमसाली नेते भक्कमपणे उभे आहेत.

लिंगायत पंचमसाली आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष यत्नाळ यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होत आहे. यत्नाळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायामुळे समाजात प्रचंड नाराजी आहे. यत्नाळ यांनी पक्षाविरोधात कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. मात्र पंचमसाली समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. संपूर्ण समाज त्यांच्यासोबत आहे, भाजप नेत्यांनी त्यांना समक्ष बोलावून चर्चा करावी, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षातही अनेक पंचमसाली नेत्यांना मंत्रिपदे न देता दुर्लक्ष करण्यात आले आहे, मात्र पंचमसाली नेत्यांकडे असेच दुर्लक्ष केल्यास पुढे त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.

Tags: