Belagavi

प्रेम प्रकरणातून नावगे गावात सशस्त्र गुंडांचा 4 घरांवर हल्ला

Share

प्रेम प्रकरणातून बेळगाव तालुक्यातील नावगे गावात फिल्मी स्टाईलने 30 हून अधिक सशस्त्र मुखवटाधारी तरुणांनी 4 घरांवर हल्ला करून हैदोस घातल्याची घटना घडली आहे. बंदुका, तलवार आणि रॉड घेऊन आलेल्या 30 हून अधिक मुखवटाधारी लोकांनी गावातील 4 घरांवर दगडफेक करून त्यांची तोडफोड केली.

फिल्मी स्टाईलने गुंडांनी गावात घुसून हैदोस घातल्याची घटना सोमवारी रात्री बेळगाव तालुक्यातील नवगे गावात घडली. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी 6 हून अधिक आरोपींना अटक केली आहे. बंदुका, तलवार आणि रॉड घेऊन आलेल्या 30 हून अधिक मुखवटाधारी हल्लेखोरांनी गावातील 4 घरांवर दगडफेक करून तोडफोड केली. त्यामुळे घराच्या खिडक्यांच्या काचा व भिंतीला लावलेल्या फरशा तुटल्या आहेत. तसेच घरासमोर उभ्या असलेल्या तीन कार आणि सहा दुचाकींचेही नुकसान केले. या मुखवटाधारी लोकांनी आजी-माजी ग्रामपंचायत सदस्यांच्या घरावरही हल्ला केला आहे.

प्रेम प्रकरणावरून बहाद्दरवाडी व नावगे गावातील तरुणांमध्ये मारामारी झाली. गावातील पुढारी व पंचांनी मध्यस्थी करून युवकांना समजावून सांगून भांडण सोडवले. तरीही आम्ही तुम्हाला बघून घेऊ, असा इशारा नावगे गावातील तरुणांनी बहाद्दरवाडी गावातील तरुणांना दिला. या पार्श्वभूमीवर बहाद्दरवाडी गावातील तरुणांनी नावगे गावात घुसून घरांवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुंडगिरीचा हा प्रकार पाहून गावातील लोक हैराण झाले आहेत. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. डीसीपी रोहन जगदीश, दोन एसीपींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सध्या गावात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

Tags: