कन्नड भाषेत नामफलक लावण्याची मागणी करत बेंगळूरमध्ये हिंसक आंदोलन केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कन्नड रक्षण वेदिकेचे प्रमुख नारायणगौडा यांच्या सुटकेची मागणी करत कन्नड संघटनांनी आज बेळगावात चन्नम्मा चौकात निदर्शने केली.
बेळगावात चन्नम्मा सर्कल येथे विविध कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करून संताप व्यक्त केला. नारायण गौडा यांना अटक करणाऱ्या पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत चन्नम्मा सर्कलमध्ये विविध कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि कन्नड कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमक झाली. अखेर पोलिसांनी टायर जप्त करून त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला.
कन्नड जमीन, भाषा आणि पाण्याचा प्रश्न असताना लढणाऱ्या कन्नड लढवय्यांना सरकारने अटक करणे योग्य नाही. करवे प्रदेशाध्यक्ष नारायण गौडा यांची तत्काळ सुटका न केल्यास राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल. तसेच बेळगावमध्ये मराठी आणि इंग्रजीतील नावाच्या पाट्या कन्नडमध्ये लावल्या पाहिजेत. तसे न केल्यास अन्य भाषेतील नामफलक हटविण्यात येतील, असा इशारा करवे कार्यकर्त्यांनी दिला.
वाजीद हिरेकुडी, अभिलाष, कस्तुरी भावी, महेश शिगीहल्ली आदी मोजके कन्नड कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


Recent Comments