Belagavi

इच्छुकांची यादी हायकमांडला दोन दिवसात पाठवणार : सतीश जारकीहोळी

Share

बेळगाव, चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात अनेक इच्छुक आहेत. त्यांच्या नावांची यादी हायकमांडला दोन दिवसात पाठवून देण्यात येईल, याचा पुनरुच्चार मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केला. बेळगावात झालेल्या धनगर समाज संमेलनात चिक्कोडीतून धनगर समाजाला तिकीट देण्याचा विचार करू, असे सांगितले होते, तिकीट देऊ असे म्हटले नव्हते असेही त्यांनी स्पष्ट केले.

बेळगावात सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, उद्या आपण विजापूरला जाणार असून तेथे इच्छुक उमेदवारांची यादी बनवणार आहे. चिक्कोडी व बेळगावमधून इच्छुक उमेदवारांची नावे गोळा करून यादी हायकमांडला पाठवणार आहे. हायकमांडची मंजुरी घेतल्यानंतर, निवडणुकीपूर्वी उमेदवाराला मतदारसंघात काम करण्यास सांगू. चिक्कोडी मतदारसंघातून धनगर उमेदवाराला तिकीट देण्यावर विचार सुरु आहे असे मी म्हटले होते. तिकीट देऊन असे कधीच म्हटलेले नाही. तेथे 2 इच्छुक उमेदवारांनी अर्ज केल्याचे सांगितले. आम्ही धनगर समाजाशी चर्चा करून त्यांचे मत जाणून घेऊनच नाव निश्चित करू.

डीसीएम पदासाठी मी अडून बसलेला नाही, ते पक्षावर अवलंबून आहे, दिल्लीत जाऊन आलोय, आम्ही सर्वजण पक्षासाठी अधिक जागा जिंकण्यासाठी कठोर परिश्रम करू, असे ते म्हणाले.  बेळगाव-गोवा व्हाया चोर्ला राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीबाबत जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. गावकऱ्यांशी चर्चा करून मार्चअखेर समस्या सोडवू. रस्त्याचे काम 2012 मध्ये मंजूर झाले आहे. चोर्ला रस्त्यासाठी 58 कोटी मंजूर झाले आहेत. एप्रिलपर्यंत काम पूर्ण करू. महाराष्ट्र-गोवा सीमेपासून कुंदापूरपर्यंतचा रस्ता करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. कालच अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली आहे. लोंढा रस्त्याबाबत प्रस्ताव आला आहे, आम्ही लवकरात लवकर टेंडर बोलावून रस्त्याचे काम पूर्ण करू. आमच्या सीमेपर्यंतचे रस्ते सुधारण्याचे आमचे कर्तव्य पार पाडू. बेळगावातील बहुमजली प्रशासकीय संकुलाची इमारत आमच्या विभागाशी संबंधित असून ती आम्ही लवकर साकारू, असे ते म्हणाले.

हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाबाबत बोलताना टेंडर काढण्याची मुदत संपली आहे. हा विषय कोर्टानेही निकाली काढला आहे. काम सुरु ठेवण्यास आम्ही महामार्ग प्राधिकरणाला सांगितले आहे. १० हजार कोटींच्या या कामांपैकी ३ कोटींचे काम झाले आहे. अजून ७ कोटींचे काम व्हायचे आहे. ते पैसेही मंजूर झाले आहेत. मात्र वनखात्याची अडचण आल्याने काम थांबले आहे. आम्ही ३१ मार्चची डेड लाईन दिल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस कार्याध्यक्षांच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, आम्ही सोमवारी यादी देऊ, त्यावर महिनाभर चर्चा होईल. शिवानंद पाटील कधी ओव्हर स्पीडमध्ये जातात, तर कधी अपघात होतो. एखाद्या कार्यक्रमाला गेल्यावर, काहीतरी बोलून टाकल्यामुळे गडबड होते, ते ज्येष्ठ नेते आहेत, आम्ही ज्येष्ठ नेत्याला काहीही बोलणार नाही, असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. एकंदर, विविध विषयांवर मंत्री सतीश जारकीहोळी यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Tags: