बेळगाव ख्रिश्चन धर्मप्रांताचे बिशप फादर डेरेक फर्नांडिस यांनी, विश्वाला प्रेम आणि शांतीचा संदेश देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिन नाताळ सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
बेळगावातील कॅम्प येथील बेळगाव ख्रिश्चन डायोसिसच्या आवारातील बिशप हाऊसमध्ये फादर डेरेक फर्नांडिस यांनी आज पत्रकारांसमवेत केक कापून ख्रिसमस सण साजरा केला. याप्रसंगी ख्रिसमसची धार्मिक गीते गाण्यात आली.
याप्रसंगी समस्त बेळगावकरांना ख्रिसमसनिमित्त प्रभू येशूचा संदेश देऊन शुभेच्छा देताना बेळगाव ख्रिश्चन डायोसिसचे प्रमुख बिशप फादर डेरेक फर्नांडिस यांनी सांगितले की, प्रभू येशूंनी आयुष्यभर मानवजातीचे कल्याण चिंतले. जगातील हिंसाचार, द्वेष, दुःख दूर व्हावे याचा ध्यास त्यांना लागून राहिला होता. तुमचे वाईट करणाऱ्यांचेही चांगले करा असा संदेश त्यांनी दिला. त्यांचा हा संदेश आजच्या काळातही तितकाच लागू पडतो. जगात आज इस्राईल-हमास सारख्या युद्धांमुळे मानवजातीची अपरिमित हानी होत आहे. आजवर ८ हजार निष्पाप मुले, महिला व नागरिक यात मृत्युमुखी पडले आहेत. असा हिंसाचार टाळण्यासाठी प्रभू येशूच्या संदेशाचे पालन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
सुमारे वीस वर्षांपूर्वी पोप जॉन पॉल दुसरे यांनी, जगात प्रत्येकाला जगण्याचा, अन्नाचा आणि निवाऱ्याचा हक्क आहे असे सांगितले होते. आपण कशाही स्थितीत असलो तरी प्रत्येक वंचिताला त्याचे हे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी पुढे आले पाहिजे. जगात आज लाखो लोक अन्न, वस्त्र, निवारा या सारख्या मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. त्यांना या सुविधा मिळवून देऊन आपण मनःशांती प्राप्त करू शकतो, यासाठी आपण प्रयत्न करावेत असे बिशप फादर डेरेक फर्नांडिस यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार लुईस रॉड्रिग्ज यांच्यासह पत्रकार, डायोसिसचे अधिकारी आदी उपस्थित होते.


Recent Comments