: बेळगावमार्गे मध्यप्रदेशला नेण्यात येत असलेली लाखो रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे. बेळगावातील काकतीजवळ वाहनांवर छापा टाकून दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक असा एकूण 50 लाखांचा ऐवज या कारवाईत जप्त करण्यात आला.
उत्पादन शुल्क पोलिसांनी बेळगावातील काकतीजवळ दोन ट्रक चालकांना अटक करून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारूच्या विरोधात मोठी कारवाई सुरू आहे. शेजारील आंध्रप्रदेश व तमिळनाडू राज्यातील ट्रकमधून गोव्यातून 20 ते 30 टन दारू परराज्यात नेण्यात येत होती. रात्रीच्या वेळी एका गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ट्रक थांबवण्यात आला होता. बेळगाव मार्गे मशरूमच्या पोत्यांमधून तस्करी होत असलेली अवैध दारू उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना उत्पादन शुल्क आयुक्त वाय. मंजुनाथ म्हणाले की, आज आम्ही गोव्यातून वाहतूक होत असलेल्या दारूचा ट्रक पकडून अवैध दारू वाहतुकीचे नेटवर्क उध्वस्त केले आहे. यात अनेक नेटवर्क आहेत, आम्ही सर्व नेटवर्कसाठी सापळे लावले आहेत. दारू आणि वाहन मिळून एकूण 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 600 बॉक्समध्ये भरून अवैध दारू नेत असल्याची माहिती मिळाली आहे.

एकंदर, बेळगाव उत्पादन शुल्क विभागाने या वर्षभरात अवैध दारू वाहतुकीचा पर्दाफाश करून अवैध दारू वाहतुकीचे अनेक प्रयत्न उधळून लावले आहेत. त्यापैकी ही आणखी एक मोठी कारवाई आहे.


Recent Comments