राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संसद भवनाच्या आवारात उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजप बेळगाव महानगर व ग्रामीणच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
राज्यसभेत मंगळवारी संसद सुरक्षेच्या मुद्द्यावरून चर्चा करताना विरोधकांनी गोंधळ घातल्यावरून उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांनी ५० हुन अधिक सदस्यांचे निलंबन केले होते. त्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी संसदेबाहेर मॉक पार्लमेंट घेतली. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी धनकड यांची नक्कल केली तर राहुल गांधी यांनी त्याचे व्हीडिओ चित्रीकरण केले. या घटनेच्या निषेधार्थ बेळगावात आज भाजप महानगर व ग्रामीण शाखेच्या सदस्यांनी चन्नम्मा चौकात ठिय्या आंदोलन केले. यावेळी काँग्रेस, राहुल गांधी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप महानगर सरचिटणीस मुरुगेंद्रगौडा पाटील म्हणाले की, उपराष्ट्रपतींसारख्या घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तींचा सन्मान कसा राखायचा, त्यांच्याशी कसे वर्तन करायचे याची साधी जाणीवही राहुल गांधी व विरोधी सदस्यांना नाही. याच्या निषेधार्थ भाजप महानगर व ग्रामीण शाखांच्या वतीने आम्ही आज आंदोलन करत आहोत.
भाजप बेळगाव ग्रामीण मंडळचे अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले की, संसद हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे. अशा मंदिरातील उपराष्ट्रपतींसारख्या घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तीचा अवमान करून राहुल गांधी व विरोधकांनी निषेधार्ह कृत्य केले आहे. लोकशाहीला काळिमा फासणारे काम त्यांनी केले आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून संसदेत विरोधक आरडाओरडा करून, गोंधळ घालून कामकाजात व्यत्यय आणत आहेत. त्यामुळे नियमानुसार त्यांच्यावर कारवाई झाली आहे. येत्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे त्यांनी सांगितले.
या आंदोलनात मनपा सत्ताधारी गटनेते राजशेखर डोनी, नगरसेवक श्रेयस नाकाडी, दादागौडा बिरादार, महांतेश वकुंद, अशोक थोरवत, लीना टोपन्नावर, शिल्पा केकरे, राजश्री पायन्नावर यांच्यासह भाजप महानगर व ग्रामीणचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments