Belagavi

लोकसभेच्या रिंगणात जारकीहोळी कुटुंबातील एकही मोहरा नसणार!

Share

बेळगाव आणि चिक्कोडी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपला सत्ता कायम राखण्यात यश आले असले तरी त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याने जिल्ह्यात काँग्रेसचा उत्साह दुणावला आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघात विजयश्री खेचून आणण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील इच्छुकांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होत आहे.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील 18 जागांपैकी भाजपला फक्त 7 जागा जिंकता आल्या, तर काँग्रेसने 11 जागा मिळवून नेत्रदीपक यश मिळवले. राज्यभरात आणि बेळगाव जिल्हयात ज्या प्रकारे काँग्रेसचा करिष्मा वाढत आहे, तो पाहता, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बेळगाव आणि चिक्कोडी मतदारसंघ काँग्रेस जिंकण्याची शक्यता आहे, असे म्हणता येईल. त्यामुळे दोन्ही मतदार संघात काँग्रेसच्या तिकिटांसाठी इच्छुकांची संख्याही वाढत आहे.

बेळगावच्या जागेसाठी काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, किरण साधुनावर, माजी खासदार अमरसिंग पाटील यांनी पक्षाच्या तिकीटासाठी लॉबिंग सुरू केले आहे. काही दिवसांपासून राजकारणापासून दूर असलेले बेळगावचे माजी खासदार अमरसिंह पाटील यांनी यावेळी काँग्रेसच्या तिकिटासाठी लॉबिंग करत काँग्रेस हायमांडवर दबाव आणण्याचा जोरदार प्रयत्न सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान बेळगाव लोकसभा मतदार संघातून जारकीहोळी कुटुंबातील एकही मोहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे सांगत सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे. बेळगावात बुधवारी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे धक्कादायक वक्तव्य केले. तिकिटांबाबत बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, आमच्या कुटुंबातून कोणीही लोकसभा लढवणार नाही. तिकिटासाठी अनेक अर्ज आले आहेत. निवडून येऊ शकतील अशांनाच आम्ही उमेदवारी देऊ, सोमवारी इच्छुकांची यादी राज्य समितीकडे पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेली 10 वर्षे बेळगाव ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असलेले विनय नावलगट्टी यांनी बेळगावात 30 वर्षे पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. जिल्हाध्यक्ष पद वगळता आजवर त्यांना मोठे पद मिळालेले नाही. त्यामुळे लोकसभेसाठी पक्षाच्या तिकीटासाठी तेसुद्धा इच्छुक आहेत. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. या इच्छुकांत प्रामुख्याने चिक्कोडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, चिदानंद सवदी आणि प्रकाश हुक्केरी यांचा समावेश आहे. त्यातही चिंगळे हे मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय मानले जातात. तशात मंत्री जारकीहोळी यांनीही यंदा चिक्कोडीतून लिंगायत किंवा धनगर समाजातील उमेदवाराला तिकीट देण्याचे सूतोवाच केल्याने चिंगळे तिकीट मिळवण्यात बाजी मारतील असे बोलले जात आहे.

दुसरीकडे बेळगाव ग्रामीण मतदार संघात विक्रमी मताधिक्क्याने निवडून आलेल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर यांना बेळगाव मतदारसंघाचे तिकीट द्यावे, अशी मागणी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समर्थकांनी यापूर्वी झालेल्या बैठकीत केली आहे. त्यामुळे बेळगावमधून मृणाल एक प्रमुख दावेदार आहेत.

एकंदर, काँग्रेस पक्षाला बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील 11 विधानसभा मतदार संघांचे पाठबळ लाभले असून, काँग्रेसने आपल्या पाच लोकप्रिय हमी योजनांच्या माध्यमातून आपले जनतेच्या मनातील स्थान वाढवले ​​आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेचे तिकीट कोणाला मिळणार हे येत्या काही दिवसांत कळणार असून, बेळगाव आणि चिक्कोडीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पुन्हा उसळी घेणार का, हे पाहणे बाकी आहे.

Tags: