अयोध्येच्या मंत्राक्षता कलशाच्या शोभा यात्रेचे येत्या बुधवारी गोकाक येथे आगमन होणार असून त्याचे भव्य स्वागत करण्यात येणार असल्याचे श्रीराम प्रतिष्ठापन अभियानाचे जिल्हा समन्वयक नंजुंड जुगुळी यांनी सांगितले.

गोकाक येथील केएलई स्कूल येथे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषद गोकाक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार परिषदेत श्री राम प्रतिष्ठापन अभियानाचे जिल्हा समन्वयक नंजुंड जुगुळी यांनी सांगितले की, 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या अयोध्येत होणार्या श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनाचा एक भाग म्हणून श्री रामजन्मभूमी मंत्राक्षता कलश मिरवणुकीचे गोकाक येथे येत्या बुधवारी आगमन होणार आहे.
आदिजांबवनगर येथील श्री वाल्मिकी मंदिरात सकाळी 9.00 वाजता कलश मिरवणुकीचे आगमन होईल. तेथे मंत्रोच्चारात कलशाचे जल्लोषात स्वागत करून शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणुकीने शहरातील रविवार पेठेतील श्री राम मंदिरात आणण्यात येणार आहे. 1 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत गोकाक आणि मुडलगी तालुक्यातील सर्व घरांना भेटी देऊन मंत्राक्षता, श्री रामाचे चित्र आणि अयोध्येतील कार्यक्रमाचे निमंत्रण पत्र दिले जाणार आहे. जिल्हाभरात सर्व गावातील घरोघरी संपर्क साधण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून शहरातील सर्व नागरिकांनी उद्याच्या शोभा यात्रा व त्यानंतरच्या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी उत्तर प्रांतातील सत्संगाचे नेते नारायण मठाधिकारी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कुरुबेट, शहराध्यक्ष आनंद पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments