Belagavi

यत्नाळ, तुम्ही क्रिटिकल इनसायडर; मुख्यमंत्र्यांची शाबासकी

Share

यत्नाळ, तुम्ही कोणालाच सोडत नाही, तुम्ही क्रिटिकल इनसायडर आहेत अशा शब्दात फिरकी घेतानाच मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी विधानसभेत आज विजयपूरचे आमदार आणि भाजपचे फायरब्रॅन्ड नेते बसनगौडा पाटील-यत्नाळ यांना शाबासकी दिली.

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभेत सकाळच्या सत्रात उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर चर्चा सुरु होती. त्यावेळी चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी भाजपचे फायरब्रॅन्ड नेते आ. यत्नाळ यांची फिरकी घेत शाबासकीही दिली. प्रारंभी सिद्दरामय्या यांनी भारतात कोल्हापूरचे महाराज छत्रपती शाहू महाराज यांनी सर्वप्रथम सामाजिक आरक्षण दिल्याचे गौरवोद्गार काढले. त्यांनी ब्राह्मणांना २५ टक्के तर ब्राह्मणेतरांना ७५ टक्के आरक्षण आपल्या संस्थानात लागू केले. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात अनेक आयोग नेमले गेले, त्यांनी यावर अहवाल दिले. पण देशात सामाजिक न्यायाचा पहिला प्रयोग शाहू महाराजांनी केल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर उत्तर कर्नाटकावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी नंजुडप्पा आयोगाने राज्यातील १७५ पैकी ११० तालुके दुष्काळी असल्याचा आणि त्यांच्या विकासासाठी काय करता येईल याच्या शिफारशी करणारा अहवाल दिल्याचे सांगितले. याच दरम्यान, चर्चेत भाग घेतलेल्या आ. यत्नाळ यांची मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी फिरकी घेत शाबासकी दिली. यत्नाळ तुम्ही आम्हालाही सोडत नाही अन स्वपक्षीयांनाही, कोणालाही सोडत नाही, तुम्ही क्रिटिकल इनसायडर आहात, असे ते म्हणाले.

यावर बोलताना, यत्नाळ यांनी, आम्ही तर दुसऱ्या-तिसऱ्या दर्जाचे आहोत, पण कोणालाही सोडत नाही असे उत्तर हसत-हसत दिले. याच दरम्यान, उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांनीही गंमतीने, यत्नाळ यांना उद्देशून, तुम्ही कोणालाही सोडत नाही हे खरे, मग याआधी कोण काय भ्रष्टाचार केला, आता काय चाललेय, पुढे काय होणार हे सांगून टाका, असे सुचविले.
त्यावर यत्नाळ यांनी, हो नक्की, वेळ आल्यावर जरूर सांगेन असे उत्तर दिले.

त्यावर मुख्यमंत्र्यानी, मी तुमच्यावर टीका करत नाहीय तर तुमचे कौतुक करतोय असे सांगितले.
त्यावर भाजपचे नरगुंदचे आमदार सी. सी. पाटील यांनी, मुख्यमंत्री सिद्दरामय्या यत्नाळ यांचे कौतुक करून त्यांच्या मुखातून नक्की काय वदवून घेऊ इच्छितात? असा प्रश्न केला. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

Tags: