Belagavi

चिक्कोडीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची गणेश हुक्केरी यांची मागणी

Share

चिक्कोडी तालुक्याला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी चिक्कोडी-सदलगा मतदार संघाचे आमदार गणेश हुक्केरी यांनी आज विधानसभेत केली.

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभेत उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर चर्चा सुरु राहिली. या दरम्यान, विविध आमदारांनी उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकला. यावेळी बोलताना आमदार गणेश हुक्केरी यांनी तालुक्याचे आकारमान, लोकसंख्या, क्षमता आणि लोकांची अनेक दशकांपासूनची मागणी लक्षात घेऊन चिक्कोडीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी केली.

चिक्कोडीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी खूप जुनी आहे, असे सांगून आ. हुक्केरी यांनी, यापूर्वी सिद्दरामय्या मुख्यमंत्री असताना तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, संघ-संस्थांचे पदाधिकारी आणि चिक्कोडी जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने या मागणीचे निवेदन त्यांना दिले होते. अथणीहून बेळगाव जिल्हा केंद्रावर यायला शेतकऱ्यांना २२० किमीचा प्रवास करावा लागतो. प्रसंगी बेळगावात मुक्काम करावा लागतो. त्यात वेळ आणि पैसे नाहक खर्च होतो. त्यामुळे चिक्कोडीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

चिक्कोडी तालुक्यात पाणी समस्या गंभीर आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी लोकांना दाहीदिशा भटकावे लागते. त्यामुळे ही समस्या निकाली काढण्यासाठी महालक्ष्मी उपसा जलसिंचन योजनेला चालना द्यावी, या योजनेचे टेंडरही मंजूर झाले आहे, त्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला गती देण्याची मागणी त्यांनी केली.

Tags: