सर्वत्र मंद तेवणाऱ्या पणत्यांचा प्रकाश, आकर्षक विद्युत रोषणाई, सुबक रांगोळ्या घालण्यासाठी महिलांची उडालेली झुंबड, शिस्तबद्धरीत्या दर्शन घेणारे भाविक अशा वातावरणात बेळगावातील शिवबसव नगरातील श्री जोतिबा मंदिरात कार्तिक दीपोत्सव जल्लोषात पार पडला.
दख्खनचा राजा म्हणवल्या जाणाऱ्या कोल्हापूरचा जोतिबा हा बेळगाव शहर, जिल्हा आणि उत्तर कर्नाटकातील मराठा व अनेक समाजाच्या कुटुंबांचा कुलदैवत. पण प्रत्येकालाच दख्खनचा या राजाच दर्शन घ्यायला कोल्हापूरला जाणे शक्य होत नाही. म्हणून चव्हाट गल्लीतील देवदादा सासनकाठी जोतिबा भक्त परिवारातर्फे बेळगावातील शिवबसव नगरात श्री जोतिबाचे हुबेहूब कोल्हापूरप्रमाणे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम, देवाची चैत्र यात्रा, श्रावणात केदारविजय ग्रंथाचे पारायण आदी उपक्रमांसह कार्तिक मासात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार काल कार्तिक मासाच्या शेवटच्या रविवारी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
जोतिबा देवाच्या भक्तांनी दीपोत्सवानिमित्त रविवारी सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. तर युवती आणि महिला भक्तांनी एक दिवस आधीच, शनिवारपासून मंदिराच्या प्रांगणात सुबक रांगोळ्या साकारल्या. सुंदर, सुबक, लक्ष्यवेधी रांगोळ्या, त्यात विविध रंगांची पखरण आणि फुले आणि पणत्यांची सजावट केली होती. त्यामुळे या रांगोळ्या अधिक उठावदार झाल्या होत्या. मोर, श्रीकृष्ण, श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाची भव्य रांगोळी सर्वात चित्तवेधक ठरली.
दरम्यन, कार्तिक दीपोत्सवाबाबत इन न्यूजला माहिती देताना माजी नगरसेवक व मंदिराचे विश्वस्त ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी सांगितले की, कार्तिक मासात आपल्या कुलदेवतेच्या नावाने दिवा लावून पूजा करण्याचा उपदेश भगवद्गीता आणि वेदांमध्ये केला आहे. त्यानुसार जोतिबा मंदिरात कार्तिक मासाच्या शेवटच्या रविवारी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यानिमित्त ११ हजार दिवे लावून देवाला श्रद्धा-भक्ती अर्पण करण्यात येते. याआधी काही भाविक कार्तिक महिन्यात एकेकटे येऊन दीप लावून जात. त्यानंतर सामूहिकरीत्या दीपोत्सव करण्याची संकल्पना भाविकांनी मंदिर समितीपुढे मांडली. ती स्वीकारून मंदिर समितीतर्फे सामूहिक दीपोत्सव सुरु करण्यात आला. यंदाच्या दीपोत्सवात भाविक महिलांनी परिश्रम घेऊन सुंदर रांगोळ्या रेखाटल्या आहेत. त्यांचे तसेच कार्तिक दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या भाविकांचे मंदिर समितीतर्फे आभार मानतो असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दीपोत्सवानिमित्त रांगोळ्या रेखाटणाऱ्या महिला रेखा यलजी, गिरीजा जोशी, सुजाता कुलकर्णी व अन्य महिलांनी कार्तिक मासानिमित्त आयोजित दीपोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. गेली ४-५ वर्षे आम्ही या दीपोत्सवात सहभागी होत आहोत. आपला धर्म, कुलदैवत, संस्कृती याविषयी नव्या पिढीला, मुलांना माहिती व्हावी, त्यांच्यावर धार्मिक संस्कार व्हावेत यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो. यात आम्ही कुटुंबियांसह सहभागी होतो. दीपोत्सवात सहभागाने एक वेगळेच समाधान आम्हाला लाभते असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कार्तिक दीपोत्सवानिमित्त मंदिरात श्री जोतिबा देवाची विशेष पूजा मांडण्यात आली होती. दिवसभर बेळगावसह तालुका व जिल्ह्यातील जोतिबा भक्तांनी गर्दी करून देवाचे मनोभावे दर्शन घेतले. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विद्युत रोषणाई आणि खास करून पणत्यांच्या प्रकाशात जोतिबा मंदिर व परिसर झळाळून निघाला होता. यावेळी मंदिर समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


Recent Comments