Belagavi

मुचंडी गावात पशुवैद्यकीय दवाखान्याचे मंत्री जारकीहोळी यांच्याहस्ते उदघाटन

Share

मुचंडी गावात सुमारे 5 वर्षांपासून पशुवैद्यकीय दवाखान्याची गरज होती, लोकांच्या मागणीनुसार गुरांवर उपचाराची सोय व्हावी यासाठी नवीन पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात आला आहे. यासोबतच पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा जनतेने लाभ घ्यावा, असे सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावात शनिवारी नवीन पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे उद्घाटन व विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
महांतेश नगर येथील पशु चिकित्सालय बेळगाव तालुक्यातील कलखांब, मुचंडी, अष्टे यांसह तीन गावे आणि शहरातील तीन वाड्यांमधील एकूण 5200 गुरांना व शेतकऱ्यांना सेवा देत आहे. एकाच ठिकाणी दोन पशुवैद्यकीय रुग्णालये कार्यरत असल्याने तसेच आजूबाजूच्या 5 गावांतील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शहरातील पशु चिकित्सालय येथे स्थलांतरित करण्यात येणार असल्याने याच परिसरात सुसज्ज विशेष पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.

मुचंडीसह अन्य गावानाही मोठा फायदा होणार आहे, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय वैद्यकीय सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. राजीव कुलेर म्हणाले की, 2020-23 या वर्षात जनावरांना लंम्पि स्किन रोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या 1372 गायींना सुमारे 3 कोटी 6 लाख नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्यात आली आहे.

याप्रसंगी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांच्या प्रतिकात्मक धनादेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मण केंचप्पा बुद्री, सदस्य संदीप जकाणे, मनोहर हुक्केरीकर, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. रेहमतुल्ला, डॉ. हन्नूरकर, डॉ. विठ्ठल संगनट्टी, डॉ. प्रकाशमणी, डॉ. प्रशांत कांबळे, डॉ. गंगरेड्डी, डॉ. पट्टण, असोदे, माळगी यल्लाप्पा, सुरेश, राघवेंद्र, तौशीफ व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: