Belagavi

बेळगाव भाजपतर्फे चेन्नई वादळग्रस्तांसाठी मदत साहित्य

Share

तमिळनाडूतील चक्रीवादळामुळे संकटात सापडलेल्या पीडितांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याला अनुसरून भारतीय जनता पक्ष बेळगाव शाखेतर्फे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या उपस्थितीत मदत साहित्य घेऊन जाणारा ट्रक रवाना करण्यात आला.

बेळगावात सद्सशिव नगरातील भाजप कार्यालयात आज, मंगळवारी सकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्याहस्ते वादळपीडितांच्या मदतीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी जमवलेले शिधा साहित्य घेऊन चेन्नईला जाणाऱ्या ट्रकला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. फ्लो
यावेळी बोलताना विजयेंद्र म्हणाले की, पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत तीन राज्यांत भाजपने नेत्रदीपक यश मिळवले.

त्याबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी यांनी तमिळनाडू व आंध्रप्रदेशातील वादळ पीडितांना मदत करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पुढे यावे असे आवाहन केले होते. त्याला अनुसरून राज्यात भाजप कार्यकर्ते मदत गोळा करत आहेत. भाजप बेळगाव शाखेनेही तांदूळ, डाळ, बिस्किटे व अन्य साहित्य जमा केले आहे. बेंगळूर येथील जगन्नाथ भवन या पक्ष मुख्यालयात पाच हजार किलो तांदूळ व अन्य साहित्य जमा करण्यात आले आहे. आज दुपारी ते चेन्नईला पाठविण्यात येईल. बेळगावात कार्यकर्त्यांनी जमवलेल्या साहित्याचा ट्रक बेंगळूरला रवाना करत आहोत. वादळामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. त्यांना या साहित्याचे वाटप करण्यात येईल. भाजप हा सामाजिक बांधिलकी मानणारा पक्ष आहे हे कार्यकर्त्यांनी सिद्ध केले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

यावेळी भाजप राज्य प्रवक्ते ऍड. एम. बी. जिरली यांनी प्रास्ताविक केले. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, बेळगाव भाजप महानगर जिल्हाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके, सरचिटणीस मुरुगेंद्रगौडा पाटील, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, उपमहापौर रेश्मा पाटील, नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, गुरुदेव पाटील, शीला गडकरी, कल्पना इटगी, दीपा कोळी, सविता करडी, माधुरी रांगणेकर, कमलाक्षी यांच्यासह भाजपच्या विविध शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उस्थित होते.

Tags: