हवाई दलाच्या पहिल्या महिला अग्नीवीरवायू तुकडीचा आणि दुसऱ्या पुरुष अग्नीवीरवायू तुकडीचा शानदार दीक्षांत संचलन सोहळा बेळगावातील सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये आज शनिवारी सकाळी पार पडला. 153 महिला अग्नीवीरवायूनी आपल्या पुरुष सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शानदार संचलन करत हवाई दलाच्या सेवेत दाखल झाल्याने आजचा दिवस भारतीय हवाई दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा ठरला.
होय, बेळगावातील सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये आज सकाळी सगळीकडे भारदस्त, जल्लोषी वातावरण निर्माण झाले होते. त्याला कारणही तसेच होते. हवाई दलाच्या 153 महिला अग्नीवीरवायूंच्या पहिल्या तुकडीचा आणि पुरुष मिळून एकूण 2280
अग्नीवीरवायूंचा प्रशिक्षणोत्तर दीक्षांत संचलन सोहळा आज मोठ्या जल्लोषात पार पडला. एकूण 22 आठवड्यांचे युद्धकौशल्याचे खडतर प्रशिक्षण घेऊन हे अग्निविरवायू आज भारतीय हवाई दलात मातृभूमीची सेवा करण्यासाठी सळसळत्या उत्साहाने दाखल झाले. सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूलचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ ट्रेनिंग कमांड एअर मार्शल आर. राधीश यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी संचलनाची आणि प्रशिक्षणप्राप्त अग्नीवीरवायूंनी सादर केलेल्या विविध कवायतींची पाहणी करून मानवंदना स्वीकारली.
यावेळी एअर मार्शल आर. राधीश यांनी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवून बक्षिसे मिळवलेल्या आणि शानदार संचलन सादर केलेल्या अग्नीवीरवायूंचे अभिनंदन केले. त्यांना संबोधित करताना अग्नीवीरवायूंना जागतिक संरक्षण क्षेत्रात उभ्या ठाकलेल्या आव्हानांची माहिती देऊन 22 आठवड्यात घेतलेल्या युद्धकौशल्य प्रशिक्षणाचा सेवाकाळात उपयोग करून घेऊन सतत बौद्धिक क्षमता वाढवून, नेहमी आदर्श घेण्यासारखी उज्ज्वल कामगिरी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जगातील चौथ्या क्रमांकाच्या मोठ्या भारतीय हवाई दलात आपल्या पाल्याना समाविष्ट केल्याबद्दल त्यांनी अग्नीवीरवायूंच्या पालकांचे अभिनंदन केले.
यावेळी प्रशिक्षणप्राप्त उत्साही अग्नीवीरवायूंनी मनोगत व्यक्त करताना आज भारतीय हवाई दलात अधिकृतरीत्या सहभागी होऊन देशसेवेची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रशिक्षणात मिळालेल्या कौशल्याचा उपयोग करून चार वर्षे आम्ही निष्ठेने देशसेवा करू, आमचे कौशल्य आणखी वाढवून देशाचे संरक्षण करू असा निर्धार व्यक्त केला.
अग्नीवीरवायूंच्या पालकांच्या चेहऱ्यावर आपल्या मुलांनी भारतीय हवाई दलात प्रवेश केल्याचा आनंद ओसंडून वाहताना पहायला मिळाला. आपल्या मुलांना देशसेवेची खूप चांगली संधी मिळाली आहे, प्रशिक्षणात त्यांनी खूप चांगली कामगिरी केल्याचा आनंद आम्हाला आहे. आमच्या मुलांनी या संधीचे सोने करून देशसेवा करावी अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.
जगातील चौथ्या क्रमांकाच्या भारतीय हवाई दलात या अग्नीवीरवायूंना 28 जून 2023 रोजी प्रशिक्षणार्थी म्हणून दाखल करून घेण्यात आले होते. 22 आठवड्यांचे कठोर शारीरिक आणि बौद्धिक, मानसिक प्रशिक्षण घेऊन आज ते अधिकृतरीत्या एअरमन म्हणून हवाई दलाच्या सेवेत दाखल झाले आहेत. यावेळी हवाई दलाचे अधिकारी, अग्नीवीरवायूंचे पालक व कुटुंबीय हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.


Recent Comments