भक्त कनकदास यांच्या जयंतीनिमित्त बेळगावात आज त्यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी मिरवणुकीला हिरवा झेंडा दाखवून चालना दिली.
अनेक भक्तिगीते रचून समाजाला अध्यात्मिक प्रगतीपथावर नेणाऱ्या या भूमीतील थोर संत भक्त कनकदास यांची जयंती आज बेळगावात मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. कनकदास चौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. विविध सांस्कृतिक पथकांच्या नृत्याने मिरवणुकीत लक्ष वेधून घेतले. धनगर समाजाची ओळख असलेले पारंपरिक पिवळे फेटे घालून, पिवळे झेंडे घेऊन धनगर, हालूमत समाजाचे सर्व वयोगटातील नागरिक नृत्य करत मिरवणुकीत सहभागी झाले होते. यात युवती आणि महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. कणबर्गी रस्ता, चन्नम्मा चौक, आरटीओ सर्कल आदी मार्गांवरून निघून कुमार गंधर्व हॉल येथे मिरवणूक समाप्त झाली.
यावेळी इन न्यूजशी बोलताना बेळगावात तालुका कुरबर समाजाचे अध्यक्ष आणि माजी महापौर यल्लाप्पा कुरबर यांनी सांगितले की, आम्ही कनकदास जयंती मोठ्या थाटात साजरी करण्याचे ठरवले होते. त्यानुसार आमचा समाज एकत्र भव्य प्रमाणात जयंती साजरी करत आहे. अनेक ठिकाणी फिरून कुमार गंधर्व रंगमंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात येत आहे. नंतर कुमार गंधर्व रंगमंदिरात जाहीर कार्यक्रम होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी, डीसीपी स्नेहा, भागन्ना नरोटी, अशोक सदलगे, सुधीर गडदे, एस. एम. पुजारी, लक्ष्मण चिंगळे आदी उपस्थित होते.


Recent Comments