Belagavi

केवळ कन्नड फलक लावण्यासाठी चन्नम्मा चौकात करवेचे आंदोलन

Share

कन्नड व्यतिरिक्त अन्य भाषेतील फलकांबाबत करवेला पोटशूळ उठला आहे. केवळ कन्नड फलक लावण्याच्या मागणीसाठी चन्नम्मा चौकात करवे कार्यकर्त्यांनी आज आंदोलन करून अन्य भाषेतील फलकांवर काळी शाई फेकून ते फाडले. यानंतर मार्केट पोलिसांनी वीस आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

बेळगाव शहरात कन्नड भाषेतील जाहिरात फलकांऐवजी इंग्रजी भाषेतील फलक लावल्याच्या निषेधार्थ करवे कार्यकर्त्यांनी इंग्रजी फलकांवर काळी शाई फेकून ते फाडून निषेध केला.

याबाबत बोलताना करवेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगेनट्टी म्हणाले की, बेळगावात केवळ कन्नड भाषेतील फलक लावण्याच्या मागणीची निवेदने महानगर पालिका आणि जिल्हा प्रशासनाला अनेकवार देण्यात आली होती. मात्र त्यांची दखल न घेतल्याने आम्ही आज चन्नम्मा चौकात आंदोलन करत आहोत. ही केवळ सुरुवात आहे. यानंतर शहरातील गल्लोगल्ली इंग्रजी भाषेतील जाहिराती काढून कन्नडमध्ये नावाच्या पाट्या लावण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा घेण्याचे ठरविले आहे. पोलीस खात्याने त्याला परवानगी दिल्यास लेले ग्राउंडवर ४ डिसेम्बरला कन्नडिगांचा मेळावा घेण्यात येईल अशी दर्पोक्ती त्यांनी केली.

करवेचे संचालक महादेव तळवार म्हणाले की, इंग्रजी भाषेतील नामफलकांना आळा घालण्यात बेळगाव जिल्हा प्रशासन व महामंडळ अपयशी ठरले असून, इंग्रजी भाषेतील नामफलक पूर्णपणे काढून कन्नड नामफलक लावण्यात यावेत, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी देऊ नये, महाराष्ट्र एकीकरण समितीने हवे तर महाराष्ट्रात जाऊन महामेळावा घ्यावा असे सांगितले.

यावेळी करवेच्या आंदोलक कार्यकर्ते व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांच्या हातातील काळ्या शाईची बाटली पोलिसांनी जप्त केली. यावेळी पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कपड्यांवर शाई सांडली. पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून संताप व्यक्त केला.
पोलिसांच्या उपस्थितीत करवे कार्यकर्त्यांनी जाहिरात फलक फाडून जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी 20 हून अधिक करवे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

करवे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगेनट्टी, सुरेश गवन्नवर, रमेश येरगन्नवर, गणेश रोकडे, रुद्रगौडा पाटील यांच्यासह करवे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

Tags: