मराठी बहुल बेळगावसह सीमाभागावर आपला हक सांगण्यासाठी कर्नाटक सरकार घेत असलेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा घेण्याचे ठरविले आहे. या महामेळाव्यातून मराठी अस्मिता दाखवून देण्याचा निर्धार शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला.
बेळगावातील रंगुबाई भोसले पॅलेसमध्ये बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची महामेळाव्याच्या तयारीबाबत मंगळवारी बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी शहर समितीचे उपाध्यक्ष बी. ओ. येतोजी होते. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही कर्नाटकाच्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बेळगावात महामेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्यावरील अन्यायाविरोधात दाद मागण्याची आणि मराठी अस्मिता दाखवून देण्याची हा महामेळावा एक संधी आहे. त्यामुळे तो यशस्वी करावा असे आवाहन समिती नेत्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कोषाध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी परवानगी मिळाली नाही तरी महामेळावा घेऊन यशस्वी करणारच असा इशारा दिला. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने अंगात समितीनिष्ठा बाणवण्याचे आवाहन त्यांनी केले. महामेळावा यशस्वी करण्यासोबतच शहर म. ए. समितीची पुनर्र्चना करण्यावर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.
दरम्यान, बैठकीनंतर इन न्यूजशी बोलताना चिटणीस रणजित चव्हाण-पाटील यांनी सांगितले की, बेळगाव शहर समितीच्या बैठकीत महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शहर समितीच्या पुनर्र्चनेवर चर्चा करून त्यासाठी इच्छुक २५० कार्यकर्त्यांची यादी खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. महामेळाव्यासाठी ११ पदाधिकाऱ्यांची समिती नेमली आहे, त्यात काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनाही सामावून घेण्याची सूचना करण्यात आली आहे, असे सांगितले.
बैठकीला मध्यवर्ती सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, चिटणीस रणजित चव्हाण-पाटील, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, सागर पाटील, मदन बामणे, अमित देसाई, मोतेश बार्देसकर, प्रशांत भातकांडे, प्रकाश नेसरकर, रणजित हावळान्नाचे, श्रीकांत कदम आदी उपस्थित होते.


Recent Comments