येथील भाग्यनगरमधील प्रभाग कर. ४२ चे भाजपचे नगरसेवक अभिजित जवळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत बुधवारी सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी दंडाला काळ्या फिती बांधून महापालिकेच्या आवारातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली.

बेळगाव महापालिकेची सर्वसाधारण सभा आज बुधवारी सकाळी आयोजित केली होती. या सभेला जाण्यापूर्वी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी महापालिका आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. मोबाईल टॉवर उभारणीला आक्षेप घेतल्याने रमेश पाटील नामक व्यक्तीने स्थानिक नगरसेवक अभिजित जवळकर यांच्यावर साथीदारांसह हल्ला केल्याची घटना घडली होती. या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना ऊत आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांनी आज पालिकेसमोर निदर्शने करून हल्ल्याचा निषेध केला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मनपाचे सत्ताधारी गटनेते राजशेखर डोणी म्हणाले की, जनतेची कामे करण्यासाठी महापालिकेत निवडून आलेले नगरसेवक अभिजित जवळकर यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. त्यानंतर पोलिसांनी नगरसेवक जवळकर यांना रुग्णालयात असतानाच अटक केल्याच्या कृतीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
स्थानिक रहिवाशांचा आक्षेप असल्याने, मोबाईल टॉवर बसविण्याबाबत प्रश्न विचारण्यासाठी गेले असता अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जवळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हे अत्यंत निषेधार्ह आहे. प्रभागातील लोक रस्ते, गटारींसह कसल्याही स्थानिक तक्रारी आधी नगरसेवकांना सांगतात. त्याची दखल घेऊन पालिका अधिकाऱ्यांसह चौकशी करणे हे नगरसेवकांचे कर्तव्य आहे. ते पार पाडत असताना अशाप्रकारे नगरसेवकांवर हल्ले होऊ लागले तर पुढे नगरसेवकांनी काम कसे करायचे असा सवाल करून सर्व ५८ नगरसेवकांना संरक्षण मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी भाजप नगरसेवक हनुमंत कोंगाळी, रवी धोत्रे, शंकर पाटील, गिरीश धोंगडी, मंगेश पवार, वीणा विजापुरे, वाणी जोशी, अभिजित जवळकर यांच्यासह सत्ताधारी गटातील नगरसेवक उपस्थित होते.


Recent Comments