गोव्यातून अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकून अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका आरोपीला अटक करून अवैध दारू आणि वाहन मिळून 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. खानापूर तालुक्यातील कणकुंबी चेकपोस्टवर ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज, शुक्रवारी पहाटे 4-30 वाजेच्या सुमारास अबकारी बेळगाव उपविभाग व अबकारी निरीक्षक, खानापूर परिमंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कणकुंबी चेकपोस्टवर रस्ता गस्त घालून वाहन तपासणी करत होते. यावेळी आयशर कंपनीच्या एका सहा चाकी वाहनाची तपासणी केली असता, गोवा राज्यात विक्रीसाठी नोंदणीकृत ब्लेंडर्स प्राइड ब्रँडच्या व्हिस्कीच्या 750 मिली बाटल्यांचे 90 कार्टून्स, 80 लिटर ब्लेंड व्हिस्कीचे 04 प्लास्टिकचे कॅन, रॉयल स्टॅगच्या कॅप आढळून आल्या. ही व्हिस्की बेकायदेशीरपणे वाहनात नेली जात असल्याचे आढळून आले.
उत्पादन शुल्क आयुक्त मंजुनाथ यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कणकुंबीजवळ, अबकारी निरीक्षक बाळगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वाहनांची तपासणी केली असता, ड्रायव्हर केबिनच्या मागे एका कंपार्टमेन्टमध्ये लपवून अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले.
80 लिटर ब्लेंडेड दारू व दारूच्या बाटलीचे कॅप जप्त करण्यात आले आहेत. रिकामी बाटल्यात ब्लेंडेड दारू भरून मूळ कॅप लावून ओरिजिनल दारू भासवून विकण्याची त्यांची योजना होती. याद्वारे ग्राहकांची फसवणूक करण्याचा डाव या भामट्यांनी रचला होता. या कारवाईत एका आरोपीला अटक करून २५ लाखांची दारू आणि १५ लाखांचे वाहन असा एकूण ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

उत्पादन शुल्क निरीक्षक बाळगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कणकुंबी चेकपोस्टचे कर्मचारी करेप्पा होलेन्नवरा, चंद्रशेखर क्षीरसागर, अमृत पुजेरी, शरणप्पा तळवार, आणि कर्मचारी या छाप्यात सहभागी झाले होते.


Recent Comments