Belagavi

बेळगावात काविळीची साथ, आरोग्य विभागाकडून जनजागृती

Share

प्रदूषित पाण्याच्या सेवनामुळे बेळगाव शहरात सध्या काविळीची साथ पसरली आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने जनजागृती मोहीम सुरु केली असून, पाणी उकळून पिण्याचे आवाहन जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी केले आहे.

बळगाव शहरातील विनायकनगर, विजयनगर, टिळकवाडी, अनगोळ आदी परिसरात काविळीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे रहिवाशांनी आरोग्य खात्याकडे तक्रार करून दखल देण्याची विनंती केली होती. नागरिकांच्या या विनंतीची जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी तातडीने दखल घेत आजपासून बेळगावात जनजागृती व तपासणी मोहीम राबवण्यास प्रारंभ केला आहे.

जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी बेळगाव शहरातील काविळीच्या तक्रारी आलेल्या विनायकनगर, विजयनगर, टिळकवाडी, अनगोळ आदी परिसरात युद्ध पातळीवर जागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी आरोग्य खात्याच्या पथकांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून जागृती केली. रुग्णांची माहिती घेऊन पाणी उकळून पिण्यासह आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. उलटी, ताप, डोळे पिवळे दिसणे अशी लक्षणे आढळून आल्यास त्वरित सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे अथवा खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यासंदर्भात ‘इन न्यूज’शी बोलताना जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी सांगितले की, बेळगाव शहरात अनेक ठिकाणी काविळीची साथ पसरल्याचे दिसून आल्याने आरोग्य खात्याच्या वतीने जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. हिपॅटायटीस-ए प्रकारची ही कावीळ असल्याचे चाचणीत आढळून आले आहे. उलटी होणे, ताप येणे, डोळे पिवळे दिसणे अशी याची प्राथमिक लक्षणे असतात. ती आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे अथवा खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत. दूषित पाणी प्याल्याने हा आजार होतो. लक्षणे दिसताच योग्यवेळी उपचार घेतल्याने साधारण आठवडा किंवा दहा दिवसांत हा आजार पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे लोकांनी घाबरून न जात वेळीच उपचार घ्यावेत.

कावीळ होऊच नये यासाठी नागरिक पित असलेले पाणी मग ते महापालिकेच्या नळाचे, बोअरवेलचे किंवा अन्य कुठल्याही प्रकारचे असो, उकळून पिणे आवश्यक आहे. त्यामुळे पाण्यातील रोगजंतू नष्ट होऊन कावीळ होण्यापासून बचाव करता येतो. पाण्याची चाचणी करून पुरवण्याचे आवाहन आम्ही महापालिकेला केले आहे. यासंदर्भात आज पालिका अधिकाऱ्यांशी बैठकही घेतली आहे. त्यानुसार ते चाचणी करून, शुद्धीकरण करूनच पाणीपुरवठा करत आहेत. लोकांनीही आरोग्य खात्याच्या सूचनांचे पालन करून कावीळ होण्यापासून आपला बचाव करावा असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, सर्वप्रथम पालिका व आरोग्य विभागाला काविळीविषयी तक्रार करणारे विनायकनगर येथील रहिवासी सुहास पाटील यांनी ‘इन न्यूज’ला सांगितले की, आमच्या घरी सध्या काविळीचे दोन रुग्ण आहेत. आपला मुलगा प्रतीक व त्याच्या सुमारे आठ मित्रांना काविळीची लागण झाली आहे. परिसरातील कुठल्याही दवाखान्यात गेल्यास काविळीचे रुग्ण अधिक आढळून येत आहेत. त्यामुळे आम्ही आरोग्य विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आरोग्य विभागाने जागृती मोहीम हाती घेतली आहे. लोकांनी त्यांच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.
एकंदर, बेळगाव शहरात कावीळ रोगाची साथ पसरल्याने दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत. काविळीचा मोठ्या प्रमाणात फैलाव होण्यापूर्वीच आरोग्य खात्याने जागृती आणि प्रतिबंधक मोहीम हाती घेतल्याने काविळीवर नियंत्रण मिळवण्यात यश येईल अशी आशा करायला हरकत नाही.

Tags: