रहिवाशांच्या मागणीनुसार खासगी व्यक्तीला मोबाईल टॉवर उभारण्यास विरोध केल्याने संबंधित व्यक्तीने साथीदारांसह भाजप नगरसेवकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बेळगावातील भाग्यनगरात घडली आहे. या घटनेत प्रभाग क्र. ४२चे नगरसेवक अभिजित अरविंद जवळकर गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरु आहेत.
बेळगाव महानगर पालिकेच्या हद्दीतील भाग्यनगर परिसरातील प्रभाग क्र. ४२चे प्रतिनिधित्व नगरसेवक अभिजित जवळकर करतात. या प्रभागात रमेश पाटील नामक व्यक्ती मोबाईल टॉवर उभारण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला स्थानिक रहिवाशांनी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विरोध केला होता. त्यासाठी नगरसेवक जवळकर व पालिका आयुक्तांना निवेदनही दिले होते. काही महिन्यांपूर्वी रात्रीच्या वेळी रमेश पाटील यांनी पुन्हा मोबाईल टॉवर उभारण्याचा प्रयत्न केल्याने हे प्रकरण टिळकवाडी पोलिसात पोहोचले होते. त्यावेळी तत्कालीन सीपीआय दयानंद शेगुणसी यांनी, काम वैध असेल तर रात्रीच्यावेळी का करता? असे रमेश पाटील यांना सुनावले होते. त्यानंतर काही काळ हा विषय थंड बस्त्यात पडला. त्यानंतर आज सकाळी पुन्हा रमेश पाटील यांनी टॉवर उभारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार रहिवाशांनी केल्याने नगरसेवक अभिजित जवळकर त्याठिकाणी गेले व त्यांनी पाटील यांना विचारणा केली. यावेळी रमेश पाटील यांनी १०-१५ मुलांसह नगरसेवक जवळकर यांना पकडून त्यांचे शर्ट फाडून रॉडने मारहाण केली. यावेळी त्यांच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट, गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेण्यात आली. कपाळावर डोळ्याजवळ दगडाने मारल्याने जवळकर याना भोवळ आली. कसेबसे ते आपल्या घरी पोहोचले. तोवर त्यांच्या साईटच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. आपण केवळ जनतेच्या मागणीवरून जनतेच्या हिताच्या दृष्टीने विचारणा करण्यास गेलो होतो, त्यावर रमेश पाटील यांनी आपल्या साथीदारांसह आपल्यावर जीवघेणा हल्ला करून लुटल्याची माहिती नगरसेवक अभिजित जवळकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भाजप नगरसेवक व जवळकर यांचे समर्थक आक्रमक झाले. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकासमोर निदर्शने केली. पालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते राजशेखर डोनी यांनी यावेळी माध्यमांसमोर आरोपींना त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेतील नगरसेवक जवळकर यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, पालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते राजशेखर डोनी व सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी इस्पितळात जाऊन नगरसेवक जवळकर यांची विचारपूस केली.
सध्या जवळकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी टिळकवाडी पोलिसात फिर्याद नोंदवण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते.


Recent Comments