दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा घेण्याचा वज्रनिर्धार केला आहे. त्यामुळे सीमाभागाचा बुलंद मराठी आवाज पुन्हा घुमणार आहे. महामेळाव्याच्या स्थळ निश्चितीसाठी ११ जणांची समिती नेमण्याचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतला आहे.
बेळगावसह अन्यायाने कर्नाटकात डांबला गेलेल्या सीमाभागावर आपला दावा सिद्ध करण्यासाठी कर्नाटक सरकारने बेळगावजवळील हलगा येथे सुवर्णसौध बांधून सीमाभागावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे २०१०पासून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कर्नाटकाच्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा घेण्यात येतो. यंदाच्या मेळाव्याची रूपरेषा ठरविण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक बेळगावातील मराठा मंदिर येथे घेण्यात आली.
‘मध्यवर्ती’चे ज्येष्ठ पदाधिकारी ऍड. राजाभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महामेळाव्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. महामेळावा यशस्वी करण्यासाठी बेळगाव शहर, तालुका व खानापूर तालुक्यातील ‘मध्यवर्ती’च्या ११ सदस्यांची समिती नेमण्यात आली. हे सदस्य महामेळाव्याचे स्थान व दिशा निश्चित करतील. यामध्ये मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, ऍड. एम. जी. पाटील, ऍड. राजाभाऊ पाटील, प्रकाश मरगाळे, मालोजीराव अष्टेकर, रणजित चव्हाण-पाटील, बी. व. येतोजी, गोपाळ देसाई, गोपाळ पाटील, मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई यांचा समावेश आहे.
बैठकीत बोलताना मध्यवर्तीचे कोषाध्यक्ष प्रकाश मरगाळे महाराष्ट्र सरकारला सीमावासियांच्या समस्यांची जाणीव करून देण्यासाठी नुकतेच पाच पानी पत्र पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारकडून मराठी सीमावासीयांसाठी योजना जाहीर करण्यात आल्या. मात्र कोणत्या योजनेसाठी कोणत्या विभागाकडे अर्ज करावा याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयात रखडलेल्या सीमाप्रश्नाच्या खटल्याला गती देण्यासाठी, सीमाकक्षाला अधिकाऱ्यांची कमतरता तसेच विविध विषयांवर महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी हे पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीतील चर्चा आणि निर्णयांची माहिती देताना मध्यवर्तीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी सांगितले की, महामेळाव्याचे स्थान आणि आराखडा ठरवण्यासाठी ११ सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती म. ए. समिती कार्यकर्ते, नेत्यांशी चर्चा करून स्थळ ठरवून त्याची माहिती देईल. महामेळाव्याबाबत सीमाभागात गावोगावी बैठक घेऊन जागृती करण्यात येईल. सीमावासियांच्या जागरूकतेने म. ए. समितीच्या पाठीशी उभे राहून महामेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीला ऍड. राजाभाऊ पाटील, कोषाध्यक्ष प्रकाश मरगाळे, मालोजीराव अष्टेकर, एस. एल. चौगुले, ऍड. एम. जी. पाटील, रणजित चव्हाण-पाटील, बी. ओ. येतोजी यांच्यासह मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments