महानगरपालिका विरोधी गटनेते आणि नगरसेवकांनी मनपाच्या महसुली उपविभागीय कार्यालये आणि बेळगाव वन केंद्राला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी विरोधी गटनेते मुजम्मिल डोनी यांनी मनपाच्या उत्पन्नात वाढ कशी होईल यावर सभागृहात आवाज उठवणार असल्याचे सांगितले.
जागा आणि मालमत्ता करासंदर्भात एजंट लोक सामील होऊन सामान्य लोकांकडून पैसे उकळत आहेत अशा अनेक तक्रारी करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज, गुरुवारी विरोधी गटनेते मुजमिल डोनी, नगरसेवक रियाज किल्लेदार, शाहिद पठाण, रेश्मा भैरकदार आदींनी अशोक नगरमध्ये असलेल्या मनपाच्या महसुली उपविभागीय कार्यालये आणि बेळगाव वन केंद्राला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.
प्रारंभी बेळगाव वनमध्ये जाऊन तेथील गर्दी पाहून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जास्त वेळ लोकांना थांबवून न घेता, त्वरित त्यांची कामे करून द्या अशी सूचना केली. यावेळी अधिकाऱ्यांनीही अनेक लोक रेशन कार्ड, आधार कार्डसाठी येत आहेत. पण सर्व्हर समस्या असल्याने काहीवेळा अडचणी येतात. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्याचे सांगितले. फ्लो
कार्यालयासमोर कचरा साफ केला नसल्याचे दिसून येताच नगरसेवकांनी संबंधितांना जाब विचारला. भरपूर लोक इकडे येतात, मनपाची इमारतच अस्वच्छ असेल तर ते बेळगाव शहर कसेकाय स्वच्छ ठेवणार असा सवाल केला. ताबडतोब कचरा साफ करा अशी सूचना विरोधी गटनेता मुजम्मिल डोनी यांनी सांगितले.

त्यानंतर वर असलेल्या महसूल कार्यालयाला विरोधी गटाच्या नगरसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी कोणीही अधिकारी नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तेथील उपस्थित महसूल अधिकाऱ्यांना रुक्मिणीनगर, अमननगर, उज्ज्वलनगर आणि अन्य ठिकाणी इमारतींना टॅक्स बसवून देण्यासाठी एजंट लोक पैसे घेत असल्याची लोकांची तक्रार आहे. अशा दलालांना तुम्ही जवळ करू नका, जी कायदेशीर प्रक्रिया आहे, त्याप्रमाणे तुम्ही काम करा असे निर्देश विरोधी गटनेते मुजम्मिल डोनी यांनी दिले.
यावेळी बोलताना नगरसेवक शाहिद पठाण म्हणाले की, दीड वर्ष झाले तरी आमच्या प्रभागांना अनुदान नाहीय, कुठलेही विकासकाम होत नाही. फंड्स नाही असे अधिकारी सांगत आहेत. जेंव्हा आम्ही आज या ठिकाणी भेट दिली तेंव्हा अनेक अधिकारी इलेक्शन ड्युटी, अधिवेशन ड्युटीला गेल्याचे दिसून आले. या महसुली अधिकाऱ्यांना कुठलीही अन्य कामे लावली नाहीत तर मनपाला टॅक्स वसुलीचा माध्यमातून भरपूर महसूल उपलब्ध होईल असे सांगितले.
रियाज किल्लेदार यांनी सांगितले की, सभागृहात मी एजंट्सच्या सुळसुळाटाची तक्रार केली आहे.यात काही अधिकारीही सामील आहेत. आम्ही जेंव्हा कामे घेऊन जातो, तेंव्हा आम्हाला कायद्यांची चौकट दाखवतात आणि एजंट लोक गेले की, त्यांची कामे त्वरित करून देण्यात येतात असा आरोप त्यांनी केला.
आजच्या भेटीबाबत महापौर आणि आयुक्तांना तक्रार आम्ही देऊ आणि लवकरात लवकर ही समस्या सुटावी अशी मागणी करणार असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.


Recent Comments