समाजकल्याण खात्याचे अधिकारी चिवटगुंडी दलितविरोधी असल्याचा आरोप करत त्यांच्या बदलीच्या मागणीसाठी डॉ. बी. आर. आंबेडकर शक्तिसंघाच्या कार्यकर्त्यांनी आज समाजकल्याण खात्याच्या कार्यालयासमोर निदर्शने केली.
बेळगावातील समाजकल्याण खात्याचे अधिकारी चिवटगुंडी हे दलितांच्या समस्यांना प्रतिसाद देत नाहीत, दलित नेत्यांचा मान राखत नाहीत, त्यामुळे त्यांची बेळगाव जिल्ह्याबाहेर बदली करावी अशी मागणी करत डॉ. बी. आर. आंबेडकर शक्तिसंघाच्या कार्यकर्त्यांनी आज गुरुवारी बेळगावात समाजकल्याण खात्याच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी राज्य सरकार व अधिकाऱ्यांच्या विरोधात हलगी वाजवत, जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.
यावेळी इन न्यूजशी बोलताना डॉ. बी. आर. आंबेडकर शक्तिसंघाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण कोलकार यांनी, समाजकल्याण खात्याचे अधिकारी चिवटगुंडी दलितविरोधी असल्याचा आरोप केला. चिवटगुंडी हे दलित नेत्यांचा मान राखत नाहीत, दलितांच्या समस्यांना त्वरित प्रतिसाद देत नाहीत. त्यांना भेटायला गेल्यास बाहेर थांबवून वाट बघण्यास भाग पाडतात, असा आरोप त्यांनी केला. गेजपती येथे नुकत्याच झालेल्या सवर्णांकडून दलितांवरील अन्यायाच्या घटनेनंतर डीसीपी, एसीपी आदी वरिष्ठ अधिकारी लगेचच घटनास्थळी दाखल झाले.
मात्र चिवटगुंडी हे त्यांना फोन करून कळवून देखील घटनास्थळी आले नाहीत. सरकारी दलित विध्यार्थी वसतिगृहातील विध्यार्थ्यांच्या समस्यादेखील ते सोडवत नाहीत. त्यांच्याशी उद्धट वर्तन करतात. अशा दलितविरोधी अधिकाऱ्याची तातडीने बेळगाव जिल्ह्याबाहेर बदली करावी अशी मागणी केली. अन्यथा याहून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनात डॉ. बी. आर. आंबेडकर शक्तिसंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments