Belagavi

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डावर सीबीआयचा छापा?

Share

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डात विविध पदांच्या भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या आणि बेकायदेशीर अतिक्रमणाच्या तक्रारी व आरोपांच्या पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला.

बेळगाव कॅम्प परिसरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. बोर्डाचे सीईओ के. आनंद यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची कसून चौकशी करत आहेत. अतिक्रमणे व बेकायदेशीर भरतीबाबत एका व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे बेंगळुर आणि दिल्ली येथील सीबीआय अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई केली. केंद्रीय संरक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेले बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड हे राज्यातील एकमेव कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे. त्याचे मुख्य कार्यालय कॅम्प, बेळगाव येथे असून, 2021 मध्ये लिपिक आणि लघुलेखकांसह 19 उमेदवारांची भरती प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमधील विविध पदांवर गेल्या 10 वर्षांपासून बेकायदेशीरपणे भरती होत असल्याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही आजतागायत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप क्लेटन कोएलो यांनी केला आहे.

शनिवारी कॅन्टोन्मेंट बोर्ड आवारात पत्रकारांशी बोलताना क्लेटन कोएलो म्हणाले की, याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही कारवाई झाली नाही. येथील कर्मचारी पैशाशिवाय कोणतेही काम करत नाहीत. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतही अनेक बेकायदेशीर कामे झाली आहेत. या बाबत दहा हजार तक्रारी होऊनही कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
एकंदर, बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयावर सीबीआयची धाड पडल्याने एकच खळबळ माजली असून याचा नेमका तपशील हाती आल्यानंतरच काय ते सत्य समजून येणार आहे.

Tags: