कर्नाटक ओपन नॅशनल मास्टर्स गेम्स-२०२३मध्ये बेळगावच्या ज्येष्ठ धावपटूंनी राष्ट्रीय पातळीवर सुयश मिळवले आहे. त्यांनी ७ सुवर्ण, ६ रौप्य, १० कांस्य अशी एकूण २३ पदके मिळवली आहेत. त्याबद्दल मास्टर्स गेम असोसिएशन ऑफ कर्नाटकाकडून त्यांचा गौरव करण्यात आला.
धारवाड येथील आरएन शेट्टी इनडोअर व ओपन स्टेडियममध्ये ४ ते ५ नोव्हेंबर दरम्यान मास्टर्स गेम असोसिएशन ऑफ कर्नाटकाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उचगावचे सुपुत्र व सध्या राणी चन्नम्मा नगर येथे राहणारे ज्येष्ठ धावपटू सुरेश देवरमनी यांनी ७० वर्षावरील गटात १० किमी, ५ किमी, १५०० मीटर आणि ८०० मीटर धावणे प्रकारात ४ रौप्य पदके तर ३०० मीटर, २०० मीटर धावण्यात प्रत्येकी एक कांस्य अशी एकूण ७ पदके मिळवली.
येळ्ळूर येथील निवृत्त जिल्हा क्रीडाधिकारी विलास घाडी यांनी, ६५ वर्षावरील गटात ८०० मीटर व १०० मीटर धावणे प्रकारात एकूण २ कांस्य पदके मिळवली.
सुळगा (हिंडलगा) येथील मारुती कणबरकर यांनी ७५ वर्षांवरील गटात भालाफेकीमध्ये सुवर्ण, व गोळाफेक स्पर्धेत कांस्य पदके मिळवली. ४००X१ रिले स्पर्धेत १ कांस्य अशी एकूण ३ पदके मिळवली.
बेळगाव येथील वसंत जाधव यांनी ८५ वर्षांवरील गटात भालाफेक व हातोडाफेकमध्ये सुवर्ण, गोळाफेकमध्ये रौप्य व थाळीफेकमध्ये कांस्य पदक अशी एकूण ४ पदके मिळवली.
हिंडलगा येथील बाळकृष्ण बेळगुंदकर यांनी ६५ वर्षांवरील गटात हातोडाफेकमध्ये सुवर्ण, भालाफेकीमध्ये रौप्य व थाळीफेकमध्ये कांस्य अशी एकूण ३ पदके मिळवली. हिंडलगा येथीलच सुरेश सांगावकर यांनी ६५ वर्षांवरील गटात ५ किमी चालणे, ५ किमी धावणे, ३०० मीटर हर्डल्स शर्यतीत सुवर्ण, १५०० मीटर धावणेमध्ये कांस्य अशी एकूण ४ पदके पटकावली.
या ज्येष्ठ क्रीडापटूंचा मान्यवरांच्या हस्ते पदक, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


Recent Comments