Belagavi

बेळगावात साडी दुकानात हातचलाखी;लाखोंच्या साड्या लांबविल्या

Share

बेळगावची मुख्य बाजारपेठ असलेल्या खडेबाजारमधील एका कापड दुकानात ग्राहक बनून आलेल्या अनोळखी महिलांनी हातचलाखी दाखवत लाखो रुपये किंमतीच्या साड्या लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.

“विरुपाक्षी एक्सलुसिव्ह सिल्क अँड सारीज” या दुकानात हातचलाखी दाखवून लाखो रुपये किंमतीच्या महागड्या साड्या लांबविण्यात आल्या. ही घटना काल, शुक्रवारी दिवसाढवळ्या घडली. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत असल्याचा गैरफायदा घेऊन ही चोरी करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

अनोळखी महिलांनी एका पुरुषाच्या मदतीने हातचलाखी दाखवत सुमारे ४ लाखांच्या साड्या लांबवल्याचे निष्पन्न झाले आहे. खरेदीच्या बहाण्याने एक पुरुष व ५ ते ६ महिलांनी दुकानात प्रवेश करून साड्या बघण्याचे नाटक करत किंमती साड्या लांबवल्या. दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करून शिताफीने महागड्या रेशमी साड्या चोरण्यात आल्या. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात याचे दृश्य चित्रित झाले आहे.

साड्या चोरीला गेल्याचे निदर्शनास येताच खडेबाजार पोलिसांना याची माहिती देण्यात आली. तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, उपनिरीक्षक आनंद आदगौडा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. या फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. खडेबाजार पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags: