Belagavi

बेळगाव तालुक्याचे लवकरच होणार विभाजन : मंत्री सतीश जारकीहोळी

Share

बेळगाव तालुक्याचे लवकरच विभाजन होणार आहे. बेळगाव दक्षिण, उत्तर आणि ग्रामीण मतदारसंघांचे विभाजन करून आणखी एक तालुका निर्माण केला जाईल असे बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

बेळगावातील जिल्हा क्रीडांगणावर आज कर्नाटक राज्योत्सव समारंभात भाग घेतल्यानंतर
जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की,
बेळगावात नवीन जिल्हा प्रशासन कार्यालय बांधण्याचा प्रस्ताव आहे. आधीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन जिल्हा प्रशासन कार्यालय बांधण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र 200 कोटींहून अधिक निधीची गरज आहे. जिल्हा प्रशासन कार्यालयाच्या प्रस्तावावर कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यामुळे रिंगरोडला विरोध होणे स्वाभाविक असून बेळगावला रिंगरोडची गरज आहे. त्यासाठी नोटिफिकेशनही निघाले असल्याने, हा प्रकल्प मागे घेता येणार नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रस्ताव पाठविल्यास भूसंपादन प्रक्रिया राबवून प्राधिकरणाला जमीन हस्तांतरित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

कर्नाटक राज्योत्सव दिनी महाराष्ट्र एकीकरण समितीने काळा दिन साजरा करणे सर्व पक्षांच्या सरकारच्या काळात केले जाते. राज्योत्सव दिनी काळा दिन साजरा करणे ही खूप मोठी चूक आहे. राज्याच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारे काही कृत्य, आगळीक केल्यास जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त कारवाई करतील, पोलीस प्रत्येकाचे संरक्षण करतात, ते त्यांचे काम आहे असे ते म्हणाले.

बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाचा गोंधळ थांबलेला नाही. बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासाठी मोठा दबाव आहे. वेगळा जिल्हा करण्याचा दबाव आहे. आपल्या भागाचा जिल्ह्याच्या रूपातून विकास व्हावा, असे प्रत्येकाच्या मनात दिसते. आता ही बाब समोर आली आहे, टप्प्याटप्प्याने चर्चा करून विकासाच्या बाजूने निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

लवकरच बेळगाव तालुक्याचे विभाजन होणार आहे. बेळगाव दक्षिण, उत्तर आणि ग्रामीण अशी विभागणी करून दुसरा तालुका निर्माण केला जाईल असे जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले. नवीन तालुका रचनेनंतर जाधवनगर आणि हनुमाननगर कोणत्या मतदार संघात असतील या पत्रकारांच्या प्रश्नावर, मॅडम (लक्ष्मी हेब्बाळकर) आणि मी एकाच ग्रामीण तालुका व मतदारसंघात राहू, राजू सेठ यांच्यासाठी वेगळी, विशेष सोय करू असे मिश्किल उत्तर मंत्री जारकीहोळी यांनी दिले.

पत्रकार परिषदेला बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त एस. एन. सिद्दरामप्पा, जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर आदी उपस्थित होते.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #belagavi #belagavitaluk #karnataka #split #satishjarkiholi