अखेर बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बुधवारी भव्य सायकल फेरी काढून काळा दिन पाळण्यात आला. यावेळी फेरीत सहभागी झालेल्या मराठी भाषिकांनी ‘बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में’ असा खणखणीत निर्धार व्यक्त केला.

१९५६च्या भाषावार प्रांतरचनेत मराठी बहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ भाषिक सीमावासीयांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दरवर्षी एक नोव्हेंबरला बेळगावसह संपूर्ण सीमाभागात काळा दिन साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे आज बेळगावसह सीमाभागात काळा दिन गांभीर्याने पाळण्यात आला.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काळ्या दिनाला परवानगी देणार नसल्याचे कर्नाटकी अधिकाऱ्यांनी ठासून सांगितले होते. मात्र काहीही झाले तरी भव्य सायकल फेरी काढून यंदा काळा दिन साजरा करणारच असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खंबीर कार्यकर्त्यांनी केला होता. अखेर मंगळवारी रात्री उशिरा अखेरच्या क्षणी परवानगी देण्यात आली. त्यानंतर एका रात्रीत कार्यकर्त्यांनी सायकल फेरीचे नियोजन केले. त्यानंतर आज, बुधवारी सकाळी बेळगावात सायकल फेरी काढून मराठी भाषिकांवरील अन्यायाचा तीव्र निषेध करण्यात आला.
शहरातील धर्मवीर संभाजी महाराज उद्यानापासून आज, बुधवारी सकाळी म. ए. समितीच्या काळा दिनाच्या सायकल फेरीला प्रारंभ झाला. त्यानंतर महाद्वार रोड, एसपीएम रोड, शहापूर खडेबाजार, सराफ गल्ली, बसवाण गल्ली, गणेशपूर गल्ली, आनंदवाडी आदी मार्गावरून फिरून मराठा मंदिरापर्यंत ही सायकल फेरी काढण्यात आली. फेरीत कार्यकर्त्यांनी ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय रहात नाही’, ‘बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में’ असा खणखणीत निर्धार व्यक्त करणाऱ्या जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
मराठा मंदिरात सायकल फेरीचे आगमन झाल्यावर तेथे जाहीर सभा घेण्यात आली. सभेत म. ए. समितीच्या ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.


Recent Comments