Belagavi

सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांचे छापे

Share

लोकायुक्त अधिकाऱ्यांनी भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. बेळगावसह अन्य ठिकाणी सोमवारी सकाळीसकाळीच गाढ झोपलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या घर आणि अन्य मालमत्तांवर छापेमारी करून त्यांना घाम फोडण्यात आला.

बेळगाव येथील पंचायत राज विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता एम. एस. बिरादार-पाटील यांच्या निवासस्थानावर लोकायुक्त एसपी हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली डीएसपी जे. रघू यांच्या पथकाने छापा टाकला.

बिरादार यांनी बेकायदेशीरपणे मालमत्ता खरेदी केल्याच्या आरोपाखाली लोकायुक्तांच्या पथकाने बेळगावातील विश्वेश्वरय्या नगरमधील श्रद्धा अपार्टमेंटमधील घर, कित्तूर आणि खानापूर येथील निवासस्थानावर छापे टाकून तपासणी केली. कलबुर्गी जिल्ह्यातील नगररचनाकार आप्पासाहेब कांबळे यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला. त्यांचे बेळगावातील रामतीर्थ नगरमधील निवासस्थान, ऑटो नगर येथील कारखान्यावर छापा टाकून शोधमोहीम राबवली जात आहे.

दरम्यान, आमच्या खानापूर प्रतिनिधीने कळविले आहे की, हुक्केरी जिल्हा पंचायत अभियांत्रिकी विभागात अभियंता असलेले महादेव बिरादार-पाटील यांच्या खानापुरातील दुर्गानगर येथील निवासस्थानावर आज पहाटे लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकून तपासणी केली. बेळगावचे लोकायुक्त एसपी हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली खानापूर येथे अधिकाऱ्यांनी हा छापा टाकला.

लोकायुक्त एसपी, लोकायुक्त सीपीआयसह लोकायुक्त अधिकाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला. अभियंता बिरादार-पाटील यांनी अनेक वर्षांपूर्वी खानापूर तालुका पंचायतीत सेवा बजावली आहे. त्यावेळी त्यांनी दुर्गानगर येथे बंगला बांधला होता. सध्या त्यांनी तो भाड्याने दिला आहे.

या बंगल्यासह त्यांच्या अन्य ठिकाणच्या मालमत्तांवरही एकाचवेळी छापे टाकून तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान बिरादार-पाटील यांच्या हुक्केरी येथील कार्यालयावरही छापा टाकण्यात आला. मात्र तोपर्यंत बेळगावातील त्यांच्या निवासस्थानावर पडलेल्या छाप्याची माहिती समजल्यानंतर त्यांच्या कार्यालयातील फायली अन्यत्र हलवल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कर्मचारीही वेळेवर कार्यालयात न आल्याने कार्यालय बंद असल्याचे सांगण्यात आले.

Tags: